नागपूर : महावितरणच्या बारामती कार्यालयातील सेवेवरील एका महिला कर्मचाऱ्याचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच आता नागपुरातील कोंढाळी जवळ शुक्रवारी सकाळी एका एसटी बस वाहकावर प्रवाशाने राॅडने हल्ला केला. विशेष म्हणजे, हल्ला करणाऱ्या प्रवाशाकडे तिकीट नव्हते. फिरोज शेख नूर शेख (३२) रा. कान्होलीबारा, हिंगणा असे आरोपीचे तर योगेश नामदेव काळे असे जखमी वाहकाचे नाव आहे. घटनेत वाहकाच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.

हेही वाचा : ‘ते ४०’…. शुक्रवारी पहाटे पाच ते आताही कार्यरत…अविरत….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एसटी महामंडळाच्या माहितीनुसार, ही बस छत्रपती संभाजीनगर आगाराची असून नागपूरहून छत्रपती संभाजीनगरला जात होती. चाकडोहजवळ वाहकाने फिरोजला तिकीट विचारले. त्याने तिकीट काढणार नाही व बसमधूनही उतरणार नाही, असे म्हणत वाद घातला. या वादातून फिरोजने वाहकाच्या डोक्यावर राॅडने हल्ला केला. वाहक बेशुद्ध पडल्याने चालकाने बस कोंढाळी पोलीस ठाण्यात नेली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. एसटीच्या नागपूर विभाग नियंत्रकांसह उपव्यवस्थापकांकडून वाहकाची माहिती घेत त्याच्या मदतीसाठी तेथे कर्मचारी पाठवण्यात आला.