नागपूर : सध्या राजकीय प्रदूषण वाढत असताना राजकारणात सगळेच असूर नसतात तर काही सुरेल माणसे असतात आणि त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. दोघेही पट्टीचे कलाकार असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. खासदार सांस्कृतिक मेळाव्याला शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.
गडकरी जसे दर्दी आहे तसे खवय्ये आहेत. त्यांचे बोलणे हे सावजीच्या रस्स्यासारखे झणझणीत असते. त्यामुळे त्यांनी बोलवल्यानंतर देवेंद्र व मी त्यांना नाही कसे म्हणू शकतो त्यामुळे मी आलो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे तुझसे नाराज नही.. हैराण हु मै…आणि देवेंद्र फडणवीस आणि माझा सूर एकच आहे. मात्र त्यांनी गायलेले श्री वल्ली हे गाणे फारच व्हायरल झाले आहे. गडकरी आणि फडणवीस दोघेही नागपूरकर असून अस्सल पट्टीचे कलाकार आहेत. राजकारणात सर्वच असूर नसतात तर सुरेल माणसे अशी आहेत. आजकाल राजकीय प्रदूषण वाढले आहे. पण गडकरीसारखी नेते मंडळी खेळीमेळीच्या वातावरणात हलके फुलके बोलून राजकीय प्रदूषण दूर करतात आणि त्यात त्यांचा हातखंडा आहे, असेही शिंदे म्हणाले.
हेही वाचा – रेल्वे प्रवाशांची मोठी अडचण होणार! तांत्रिक कामामुळे ‘या’ गाड्यांच्या फेऱ्या रद्द
देशभरात गडकरी साहेब विकास कामे, रस्त्याचे जाळे निर्माम करत आहेत. विकासासाठी आपले योगदान मोठे आहे. या महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कलावंत हजेरी लावतात. शिवाय स्थानिक कलावंतांना संधी दिली जाते. राज्य व देशाच्या सर्वागीण विकासात गडकरी यांचे मोठे योगदान आहे तसे सांस्कृतिक क्षेत्रात आहे. राज्यात ते मंत्री असताना त्यांच्याकडे असलेला विभाग आज माझ्याकडे आहे. एकेकाळी तोट्यात असलेल्या या विभागाच्या माध्यमातून राज्यात खूप मोठे काम गडकरी यांनी केले आहे आणि आता माझ्याकडे असल्यामुळे मी त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे, असेही शिंदे म्हणाले.