नागपूर : महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात मध्यप्रदेश, छत्तीसगडमधील काँग्रेसचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी झाले आहेत. तर तेथे भाजपला नाकारले आहे. यावरून महाराष्ट्रात काँग्रेसची लाट असल्याचे दिसून येते, पुढील निवडणुकीत त्यांचा परिणाम दिसेल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते आज नागपुरात बोलत होते. “जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे. निवडणुकीतील पराभवाच्या कारणांचा अभ्यास करू आणि पुढे जाऊ. परंतु महाराष्ट्राला लागून असलेल्या जिल्ह्यातील निवडणुक निकाल बघितल्यास काँग्रेसला लोकांनी पसंती दिली आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत त्यांचा निश्चित परिणाम दिसून येईल. भाजप अधिक काळ सत्तेत राहू शकणार नाही. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी विजयाचा आनंदोत्सव साजरा करावा की नाही, हा त्यांच्या प्रश्न आहे”, असे पटोले यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : ‘या’ चार जिल्ह्यांत आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राचा थरार, उल्का वर्षाची पर्वणी; जाणून घ्या कुठे, केव्हा…
ते पुढे म्हणाले, “पण, राज्यात महापालिका निवडणुका न घेता सत्ताधारी प्रशासकाच्या माध्यमातून जनतेची लुट करीत आहे. लोकांना वाऱ्यावर सोडले आहे. महाराष्ट्रात कधी नव्हे इतके मृत्यू डेंग्यूमुळे झाले आहेत. अलिकडे कल्याण येथे एका महिलेचा बाळाला जन्म दिल्यानंतर डेंग्यूने मृत्यू झाला. अशा मृत्यूची लाज सत्ताधाऱ्यांना लाज वाटत नसेल आणि शेजारच्या राज्यातील विजयाचा आनंद होत असेल तर त्यावर अधिक भाष्य करणे अयोग्य आहे.” दरम्यान, संजय राऊत यांनी काँग्रेसने समाजवादी पक्षासोबत जागा वाटप केले असते तर चित्र वेगळे असते असे म्हटले आहे. त्यावर पटोले यांनी भाष्य करण्यास नकार दिला.