गडचिरोली : भाजपने जाहीर केलेला पहिल्या यादीत जिल्ह्यातील केवळ आरमोरीचा समावेश आहे. यात गडचिरोलीचे नाव नसल्याने पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली असून विद्यमान आमदार डॉ.देवराव होळी यांना उमेदवारी दिल्यास भाजपमधील एक मोठा गट पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. तर होळींनी देखील समर्थकांना पुढे करून दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे.

गडचिरोली विधानसभेसाठी भाजपमधून विद्यमान आमदार डॉ.देवराव होळी यांच्या व्यतिरिक्त डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी या तिघांमध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. आमदार होळी यांच्या विरोधात आदिवासी समाजाची असलेली नाराजी आणि लोकसभेत पक्षविरोधी कारवाया केल्याच्या तक्रारी, यामुळे याठिकाणी उमेदवार बदलण्यासंदर्भात पक्षाकडून चाचपणी करण्यात आली. दुसरीकडे संघपरिवाराचे जवळचे असलेले डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासाठी संघ आणि भाजपधील महत्वाचे पदाधिकारी आग्रही आहे. त्यामुळे भाजपमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. पहिल्या यादीमध्ये गडचिरोलीचे नाव नसल्याचे बघून आमदार होळी समर्थकांमध्ये खळबळ उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील घटक पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी होळी यांना उमेदवारी देण्याची मागणी केली.

हेही वाचा…यूजीसीचे विशेष कौशल्याधारित अभ्यासक्रम , काय आहे नाविन्य …

मात्र, यात भाजपचे महत्वाचे पदाधिकारीच अनुपस्थित होते. उमेदवारी जाहीर करण्यात विलंब होत असल्याने डॉ. मिलिंद नरोटे समर्थकदेखील अस्वस्थ झाले आहे. भाजप आणि संघातील एक मोठा गट नरोटे यांच्या पाठीशी आहे. त्यांचा होळींच्या उमेदवारीला विरोध आहे. त्यामुळे आज गुरुवारी नरोटे समर्थकांनी एक बैठक आयोजित केली असून नरोटे यांना उमेदवारी न मिळाल्यास पक्षाला सोडचिठ्ठी देणार असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे गडचिरोलीची उमेदवारी जाहीर करताना भाजप नेतृत्वाची चांगलीच दमछाक होणार आहे.

हेही वाचा…दिवाळीत अवकाशात मनमोहक घडामोडींची पर्वणी,पृथ्वीवरुन पाच ग्रहांचे…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार होळी समर्थकांची २५ ला सभा

आमदार होळी उमेदवारीसाठी दाबतंत्राचा वपार करीत असून २५ ऑक्टोबरला त्यांनी समर्थकांची सभा आयोजित केली आहे. यामध्यमातून ते पक्षावर दबाव निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे गडचिरोली भाजपामध्ये मोठे राजकीय वादळ उठण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे डॉ. उसेंडी हे देखील उमेदवारीसाठी आग्रही आहेत. त्यांच्यासाठी चिमूरचे आमदार बंटी भंगाडिया मैदानात उतरले आहे. उसेंडी यांना उमेदवारी मिळावी म्हणून भंगाडिया यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना गळ घातली आहे. परंतु स्थानिक भाजप पदाधिकारी त्यांच्यासाठी अनुकूल नाही. त्यामुळे ऐन निवडणुकीत भाजपला बंडाखोरीचा फटका बसू शकतो.