नागपूर : वसंतराव नाईक प्रतिष्ठान आणि वनराई फाउंडेशनतर्फे देण्यात आलेला प्रयोगशील शेतकरी पुरस्कार स्वीकारताना सेवा सदन संस्थेच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांनी केलेला मंत्रोच्चाराने सोयाबीनचे पीक वाढवण्याचा दावा हा संपूर्णपणे अशास्त्रीय आहे. या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, महाराष्ट्रातील हरित क्रांतीसाठी मोठे काम केलेले माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी महाराष्ट्र अंनिस मार्फत प्रसिद्धी पत्रकाच्या द्वारे करण्यात आली आहे

अनिसने या संदर्भात एक पत्रक प्रसिद्धीला दिले आहे. त्यानुसार, हा पुरस्कार स्वीकारताना कांचन गडकरी यांनी केलेला “शेतात बियाणे पेरल्यापासून धर्मसंस्कार केले तर शेती भरघोस उत्पादन देते. आम्ही आमच्या धापेवाड्यातल्या शेतीत सोयाबीनला श्री सूक्त व मंत्रोच्चार ऐकवले. त्यामुळे उत्पादन वाढले.” हा दावा पूर्ण पणे अशास्त्रीय असून शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा आहे. मंत्रोच्चारांच्यामध्ये काही विशेष सामर्थ्य असते आणि ते ऐकून सोयाबीनचे झाड स्वत:चे उत्त्पन्न वाढवू शकते ही गोष्ट शास्त्राच्या प्राथमिक तपसणीवर देखील टिकणारी नाही. सध्या वारी चालू असून ज्ञानेश्वर महाराज यांनी बाराव्या शतकात ‘मंत्रेची वैरी मरेI तर का बांधावी कट्यारे?II’ म्हणजेच मंत्राने शत्रू मरत असेल तर कट्यार काय कामाची? असा कार्यकारण भाव सांगणारा प्रश्न विचारला आहे. असे असताना एकविसाव्या शतकात मंत्राने सोयाबीनचे उत्पन्न वाढवण्याचे दावे करणे हे उलट्या पावलाचा प्रवास आहे. असे पत्रकात नमूद आहे.

शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार

सोयाबीनचे शेतकरी गेली अनेक वर्षे शासनाच्या धोरणाच्यामुळे अडचणींत येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोयाबीनला शासनाने सांगितलेला हमी भाव न देता अशा स्वरूपाचे दैववादी उपचार सांगणे हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्यासमोर ते केले जात असताना त्यांनी जर त्याचे खंडन केले नाही तर शेतकऱ्यांना ते खरे वाटू शकते. म्हणून पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि हा पुरस्कार देणाऱ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या विषयी आपली भूमिका जाहीर केली पाहिजे, अशी मागणी पत्रकातून करण्यात आली आहे.

जगभरात होणाऱ्या एकूण सोयाबीन उत्पन्नाच्या पैकी ४०% ब्राझील , २८ टक्के अमेरिका १२ टक्के आर्जेन्टिना देशांमध्ये होते भारतामधील सोयाबीन उत्पन्न हे जागतिक सोयाबीन उत्पनाच्या केवळ तीन टक्के आहे. सोयाबीनचे उत्पन्न वाढवायला कुठल्याही मंत्र तंत्राची गरज नाही हे वरील आकड्यांवरून स्वयंस्पष्ट आहे. जगभरातील शेतकरी आता कृत्रिम बुद्धिमता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे भरघोस उत्पन्न घेत असताना भारतामध्ये मात्र अशा अशास्त्रीय गोष्टींवर चर्चा होत आहे हे भारताच्या विकासासाठी हानीकारक आहे असे देखील प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ह्या गोष्टींचा वेळीच विरोध केला नाही तर उद्या कृषी विद्यापीठात ह्या विषयीचे कोर्स चालू झालेले दिसले तर नवल नाही म्हणून कृषी विद्यापीठ आणि शेतकरी संघटना यांनी देखील या विषयी भूमिका जाहीर करावी, अशी अपेक्षा या पत्रकाच्या माध्यमातून महाराष्ट्र अंनिस मार्फत नंदिनी जाधव , मिलिंद देशमुख, राहुल थोरात हमीद दाभोलकर राजीव देशपांडे रामभाऊ डोंगरे प्रकाश घादगिने, सम्राट हटकर मुक्त दाभोलकर अशोक कदम मुंजाजी कांबळे फारुख गवंडी प्रवीण देशमुख यांनी केली आहे