नागपूर : बुध्दगयेतील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बौध्दबांधवांनी नागपुरातील दीक्षाभूमी ते संविधान चौक दरम्यान शांती मार्च काढून केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडे दीक्षाभूमीला भेट दिली होती. त्यावेळी परम पूज्यनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षांनी महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या स्वाधीन करण्याची विनंती केली होती हे येथे उल्लेखनीय.

महाबोधी महाविहार हिंदू समाजाकडे आहे. तो बौद्ध समाजाकडे हस्तांतरित करण्यासाठी कायद्यात बदल करण्याची मागणी आवश्यकता आहे. या मागणीसाठी आज पवित्र दीक्षाभूमीतून पंचशील ध्वज हातात घेत बौद्ध बांधवांनी शांती मार्च काढला. सुमारे चार किमी लांबीची ही रॅली संविधान चौकात आली. पावसाच्या सरीतही रॅली सुरूच होती. तेथे पुज्य भंतेगण व विविध संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत बुध्दगया येथे आकाश लामा, भिक्खू संघ, समता सैनिक दल, भारतीय बौध्द महासभा व इतर बौध्द संघटनांच्यावतीने सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. बुध्दगया टेंपल ॲक्ट – १९४९ रद्द करून महाविहार पूर्णपणे बौध्दांच्या ताब्यात देण्याचा हा लढा आहे. आता या लढयाने देशभर व विदेशातही तीव्र रूप धारण केले आहे.

भिक्खू संघाच्या नेतृत्वात आणि समता सैनिक दलाच्या नियंत्रणात शांती मार्च काढण्यात आला. शांती मार्चमध्ये भारतीय बौद्ध महासभा, ऑल इंडिया बुद्धीस्ट फोरम, समता सैनिक दल आणि सर्व बुद्धीस्ट संघटना, समस्त बुद्धविहार समिती सहभागी होत्या. शंकर ढेंगरे,प्रकाश दार्शनिक, अल्का चौकीकर, सुरेश पाटील,संजय फुलझेले, मनोज बंसोड, उमेश बोरकर, अजय सहारे, प्रा. राहूल मून, प्रसन्ना सहारे, अरूण गाडे, अशोक जांभुळकर, राजकुमार वंजारी आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

मार्चला भदंत प्रियदशीं, भदंत नागदिपंकर, भदंत सीलवंस, भदंत नागसेन, भदंत चंद्रकितीं, भदंत हर्षदीप यांनी संबोधीत केले. भदंत देवानंद आणि भिक्खूखण तसेच श्रामणेरवर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी नरेश वाहाणे, विलास नितनवरे, सुनील शेंडे, मनोहर गायकवाड, जयंत इंगळे, सुनील सारीपुत्त, रणजीत रामटेके, राजेश ढेंगरे, पृथ्वी मोटघारे, अमर दिपंकर, पुष्पा घोडके, पद्माकर गणवीर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी परीश्रम घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फलक, पंचशील ध्वजाने वेधले लक्ष

शुभ्र पांढरे वस्त्र, डोक्यावर निळी टोपी, हातात पंचशील ध्वज घेऊन अनुयायी शांती मार्चमध्ये सहभागी झाले होते. बीटी ॲक्ट आणि महाबोधी महाविहाराचे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. दीक्षाभूमी ते संविधान चौकपर्यंत बुद्धं‍ शरणं गच्छामीचे स्वर कानावर पडत होते. आकाशात मेघ दाटून आले आणि पावसाच्या सरींनी या शांती मार्चचे जणू स्वागत केले. या वेळी शंभर मीटर लांबीचा पंचशील ध्वज आकर्षनाचे केंद्र ठरला. काचीपुरा, रामदासपेठमार्गे निघालेला शांतीमार्च जनता चौक, पंचशील चौक, व्हेरायटी चौक, गोवारी चौकमार्गे संविधान चौकात पोहोचला.