नागपूर : उद्धव ठाकरे यांनी लंडनमध्ये इक्बाल मिर्चीसोबत डिनर केले, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात आमदार नितेश राणे यांचे उपराजधानीत आगमन झाले. याप्रसंगी त्यांनी मराठा आरक्षण, संजय राऊत, आदित्य ठाकरे, रोहित पवार, लव्ह जिहाद, आदी मुद्यांवरही भाष्य केले.

राणे म्हणाले, आदित्य ठाकरे यांचे लग्नाचे वय झाले आहे, वडिलांना सोबत घेऊन फिरायचे नसते. संजय राऊत यांच्यावर चप्पल भिरकावल्याप्रकरणी राणे म्हणाले, “घाण चपलांनीच साफ करायची असते. घाणीला हात लावायचो नसतो. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी जे केले त्याचा अभिमान आहे.” लव्ह जिहाद प्रकरणात जिहादी वृत्तीचे नेते आमच्या हिंदू भगिनींना धमकावत आहेत. त्यामुळे लव्ह जिहादची प्रकरणे पुढे येत नाहीत. माझ्याकडे या संदर्भात पुरावे असल्याचेही त्यांनी सांगितले. रोहित पवार हा महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘ओरी’ आहे. तो माहिती नाही कशाला यात्रा घेऊन निघाला आहे. ‘ओरी’ला आपण किती गांभीर्याने घ्यायचे, हा प्रश्नच आहे.

हेही वाचा : “गुडघ्याला बाशिंग बांधून रोहित पवारांचा नेता बनण्याचा प्रयत्न”, राम शिंदे यांची संघर्ष यात्रेवरून टीका; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाकरे, शरद पवार गटाला संपवण्यासाठी….

उद्धव ठाकरे गटाला संपविण्यासाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत पुरेसे आहेत, तर शरद पवार गटाला संपविण्यासाठी राजकारणातील हा ‘ओरी’ सक्षम आहे, असा टोलाही आमदार नितेश राणे यांनी लगावला. गोपीचंद पडाळकर यांच्यावर चप्पल भिरकविणारे मराठा समाजाचे लोक नाहीत. मराठा समाज शांतताप्रिय आहे. मराठा समाजाचे ५८ विराट मोर्चे निघालेत. पण, कुणालाही धक्का लागला नाही. आता, कुठे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करायची, कुठे पडाळकरांवर हल्ला करायचा, याला मराठा समाज म्हणत नाही. सध्या जे सुरू आहे ते मराठा समाजाला बदनाम करणारे आहे, असे आमदार नितेश राणे म्हणाले.