नागपूर : कोट्यवधी रुपयांचा प्राप्तीकर चोरी केल्याच्या प्रकरणात गो- गॅस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नितीन खारा यांच्या रामदासपेठ येथील कार्यालयासह गोदामाची प्राप्तीकर विभागाच्या पथकाने मंगळवारी दिवसभर झडती घेतली. खारा यांच्यावर वर्षभरात झालेली ही तिसरी मोठी कारवाई आहे.

विना परवाना व्यवसाय, अवैध सिलेंडरची साठवणूक, सुरक्षा नियमांचे उल्लंघन, कोट्यवधींची प्राप्तीकर चोरी या सारख्या गंभीर प्रकरणांमध्ये मुंबई येथून आलेल्या पथकाने दिवसभर झडती घेतल्याची माहिती आहे. नितीन खारा हे पेट्रोलियम कंपनी असलेल्या कॉन्फिडन्स समुहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.

या समुहाची उप कंपनी असलेल्या गो गॅसचे देशभरात पेट्रोलियम गॅस पंप आणि इंधनपंप आहे. खारा यांनी आपल्या कॉन्फिडन्स पेट्रोलियम कंपनीची नोंदणी मुंबई येथून केली आहे. मात्र, कंपनीचे मुख्यालय नागपुरात दाखवण्यात आले आहे. खारा यांच्या या समुह कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांची प्राप्तीकर चोरी केल्याच्या प्रकरणात आयकर विभागाने यापूर्वीही त्यांच्याकडे छापे टाकले होते.

खारा हे पूर्वी लोखंडी सिलेंडर बनवून ते पेट्रोलियम कंपन्यांना पुरवत होते. साधारण २० वर्षांपूर्वी त्यांनी कॉन्फिडन्स पेट्रोलियम समुहाची स्थापना केली. या समुहाची उपकंपनी असलेल्या गो गॅस मार्फत सिलेंडरमध्ये गॅस रिफिलिंग केले जाते. खारा यांनी या कंपनीची नोंदणी मुंबईत करून सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाची दिशाभूल केल्याचा ठपकाही यापूर्वी प्राप्तिकर विभागाने ठेवला होता.

करचोरीचा आरोप

कोट्यवधी रुपयांचा कर चोरी केल्या प्रकरणात वस्तू आणि सेवा कर विभागाने यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये गो गॅस कंपनीच्या छत्तीसगडमधील रायपूर आणि दुर्ग येथील प्रतिष्ठानांवर छापे टाकले होते. विनापरवाना व्यवसाय केल्या प्रकरणात मे २०१९ मध्येही गो-गॅसच्या रायपूर येथील कार्यालयावरही छापा टाकण्यात आला होता. ज्यात १ कोटी रुपयांचे हजारो सिलेंडर जप्त करण्यात आले होते.