नागपूर : गोकुळपेठ बाजारात उभारण्यात येत असलेल्या बहुमजली वाहनतळाचे काम थांबवा, अशी नोटीस नागपूर सुधार प्रन्यासने नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला बजावली आहे. या जागेवर नासुप्रला शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारायचे असल्याची माहिती नासुप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांनी दिली. गोकुळपेठ बाजारात नासुप्रच्या जागेवर स्मार्ट सिटीकडून बहुमजली वाहनतळ उभारण्यात येत आहे. त्यासाठी २०.८८ कोटीची निविदा काढण्यात आली होती. कामालादेखील प्रारंभ झाला. आता अचानक नागपूर सुधार प्रन्यासने ते काम थांबवण्याचे पत्र दिले आहे. व्हीआयपी मार्गावर वाहनतळाची समस्या दूर करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. येथे ६४ चारचाकी आणि १५० दुचाकी राहतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. परंतु आता नासुप्रने त्यावर हरकत घेतली आहे.
हेही वाचा : वतमाळ: पर्यटन मंत्रालयाच्या योजनांचे आमिष; फसवणुकीचा आकडा सव्वा कोटींच्या घरात
विशेष म्हणजे, एनएसएससीडीसी या कंपनीत नासुप्र आणि महापालिकेचा मिळून २५ टक्के वाटा आहे. नागपूर शहरात वाहनांची संख्या वाढत आहे. बाजारपेठेत पर्याप्त जागा उपलब्ध नाही. महापालिकेतर्फे उपलब्ध करण्यात आलेली जागा कमी पडत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे पॅन सिटी भागात मॅरीगो राऊंड (आकाश झुला) प्रमाणे ऑटोमेटेड/मॅकेनाईज्ड मल्टिलेव्हल कार आणि दुचाकी वाहनतळाची सुविधा निर्माण केली जाणार आहे. नागपूर स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने या प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली आहे. यामुळे नागपूर शहरातील पार्किंगच्या समस्येवर दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.