नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासकडून वसतिगृहासाठी भाडेपट्ट्यावर (लिज) घेतलेल्या भूखंडावर अनधिकृतपणे मंदिर उभारल्याची बाब समोर आल्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची कुकडे लेआऊट येथील श्री जगन्नाथ मंदिराची भेट रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रपती दोन दिवसांच्या नागपूर भेटीवर येत आहेत. यावेळी त्या कुकडे लेआऊट येथील श्री जगन्नाथ मंदिरातील आरतीत सहभागी होणार होत्या. त्यांच्या दौऱ्यात तसे नमूद करण्यात आले. राष्ट्रपती यांच्या राजशिष्टाचारानुसार त्यांचा दौरा जेथे होतो किंवा ज्या स्थळाला त्या भेटी देतात त्या सर्वांची माहिती गोळा केली जाते. सर्व कायदेशीर बाबी तपासल्या जातात.

राष्ट्रपती ज्या मंदिराला भेट देणार होत्या त्याबाबत माहिती घेण्यात आली. त्यानुसार हे मंदिर नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर उभारण्यात आले आहे. नासुप्रने कुकडे ले-आऊट येथील भूखंड ओरिया समाज या संस्थेला भाडेतत्त्वावर दिला आहे. हे भूखंड वसतिगृह बांधण्यासाठी ओरिया समाज संस्थेला देण्यात आले होते. ५० टक्के सवलतीच्या दरात हे भूखंड दिले गेले. परंतु, या संस्थेने आधी वसतिगृहासोबत लग्न कार्यासाठी सभागृह बांधले. अशाप्रकारे त्याचा व्याावसायिक वापर करण्यात आला. विशेष म्हणजे, यासाठी नागपूर सुधार प्रन्यासची परवानगी देखील घेतली नाही.

हेही वाचा : काँग्रेस-वंचितमधील वैरत्व दूर होणार?

एका कामासाठी नासुप्रकडून घेतलेले भूखंड दुसऱ्या कामासाठी वापरणे बेकायदेशीर ठरते. यासाठी नासुप्रने ओरिया समाज संस्थेला नोटीस देखील बजावली होती. त्यानंतर सभागृह पाडून श्री जगन्नाथ मंदिर उभारण्यात आले. राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्ताने या मंदिराबाबत विचारणा केल्यानंतर ही बाब समोर आली. त्यामुुळे अखेर राष्ट्रपतींची मंदिर भेट रद्द करण्यात आली, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा : चार दिवसांपासून होता बेपत्ता, अखेर मृतदेहच सापडला; प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या झाल्याचा संशय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाचे उदघाटन १ डिसेंबरला होणार आहे. तसेच शनिवार, २ डिसेंबरला राष्ट्रपती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १११ व्या दीक्षांत समारंभात सहभागी होणार आहे.