नागपूर: येथील मेडिकल आणि मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय (डागा) आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) या शासकीय रुग्णालयांना पावसाच्या तडाख्याचा चांगलाच फटका बसला. मेडिकलच्या बऱ्याच वार्डात पाणी शिरल्याने रुग्णशय्येखाली पाणी साचले. या स्थितीतही रुग्णांवर उपचार केले गेले.
राज्यात केवळ नागपुरातच मेडिकल आणि मेयो ही दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये आहेत. सोबत नागपुरात एम्स या नावाजलेल्या वैद्यकीय संस्थेसह डागा हे स्त्री रुग्णालयही आहेत. शुक्रवारी रात्रीपासून पडणाऱ्या पावसाचा फटका या सगळ्याच शासकीय रुग्णालयांना बसला. मेडिकलच्या तळमजल्यावरील बऱ्याच शल्यक्रिया गृहांसह नेत्र, अस्थिरोग विभागातील वार्डात पाणी शिरले. ट्रामा सेंटर ते मेडिकलच्या इमारतीला जोडणाऱ्या रॅम्पला जोडलेल्या मेडिकलच्या पहिल्या माळ्यावरही पाणी शिरले.
हेही वाचा : धक्कादायक! अफगाणी नागरिकांनी बनवले भारतीय मतदान कार्ड….
मेडिकलच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी एकीकडे तातडीने पाणी बाहेर काढण्यासह स्वच्छतेचे काम हाती घेतले असले तरी दुसरीकडे डॉक्टरांनीही रुग्णांवर उपचार केला. रुग्णांना त्रास होऊ नये व त्यांच्यावर योग्य उपचार व्हावा म्हणून अधिष्ठाता डॉ. राज गजभिये आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्यासह सगळे वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून होते. मध्य नागपुरातील डागा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या गर्भवती महिलांना जीव मुठीत घेऊन डॉक्टरांपर्यंत पोहचावे लागत होते. परंतु सोनोग्राफी विभागाजवळ पाणी असल्याने तपासणी बंद ठेवावी लागली. एम्स आणि आयआयएमच्या मध्ये सुमारे दीड ते दोन फूट पाणी तुंबले होते. एम्सच्या बाह्यरुग्ण विभागातही पाणी शिरले. त्यामुळे बराच काळ येथील नोंदणी थांबवावी लागली होती. मेयो रुग्णालयातील विद्यार्थी वसतिगृहासह बाह्यरुग्ण विभागातही पावसाचे पाणी शिरले.
हेही वाचा : नागपूरच्या पिपळा फाटा भागात एक कुटुंब छतावर अडकून; महापालिका म्हणते, “आमची हद्द नाही…”
पीडब्लूडीच्या भोंगळ कारभाराने पाणी मेडिकलमध्ये
मेडिकल रुग्णालय परिसरात ट्रामा सेंटर ते मेडिकलला जोडणाऱ्या रॅम्पचे कामस व इतरही कामे सुरू आहेत. ही कामे करताना मलबा सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाली परिसरात अडथळा आणणार नाही, ही जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची (पीडब्लूडी)ची आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होण्यासह दुसरीकडे नूतनीकरणानिमित्त पीडब्लूडीच्या कंत्राटदारांनी काही भिंतीही पाडल्या. त्यामुळे हे सर्व पाणी मेडिकलच्या वार्डात शिरले.
नागपुरात शासकीय रुग्णालयांना पावसाच्या तडाख्याचा चांगलाच फटका बसला आहे. मेडिकलच्या बऱ्याच वार्डात पाणी शिरल्याने रुग्णशय्येखाली पाणी साचले. या स्थितीतही रुग्णांवर उपचार केले गेले. pic.twitter.com/e7GswQqpmd
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— LoksattaLive (@LoksattaLive) July 20, 2024
त्यामुळे या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या पीडब्लूडीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार काय? अशी चर्चा मेडिकलच्या अधिकाऱ्यांमध्ये रंगली होती. या सर्व प्रकारामुळे रुग्णांना मात्र प्रचंड त्रास सहन करावा लागला.