Nagpur Breaking News Update Today : औरंगजेबाची कबर हटवण्यावरुन सुरु झालेल्या वादाला नागपुरात सोमवारी हिंसक वळण लागलं. शिवजयंतीच्या दिवशीच नागपुरच्या महाल भागात दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीनंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. या हिंसाचाराच्या घटनेत काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. यानंतर आता मंगळवारी सकाळपासून पोलिसांनी परिसरात शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पोलिसांकडून संपूर्ण परिसरातील दगड जमा करण्यात आले. यामध्ये तब्बल अर्धा ट्रक दगड पोलिसांनी जमा केले आहेत. तर आतापर्यंत ४८ वाहनांची तोडफोड झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीनंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाल परिसरातील सर्वच दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी बळजबरीने दुकाने बंद करण्यास सुरुवात केल्यामुळे नेहमी वर्दळीचा भाग असलेल्या महाल परिसरातील नागरिकांमध्ये एकच धावपळ झाली. पोलिसांनी मोठी कुमक मागवून बंदोबस्त तैनात केला. महाल परिसरात जवळपास एक हजार पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली असून गाड्यांचे नुकसान करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समाजकंटकांनी पोलिसांच्या दिशेने दगड फिरकवले होते. हे दगड आज सकाळी जमा करण्यात आले. यावेळी एका छोट्या ट्रकमध्ये दगड जमा केले असता ते अर्धा ट्रक होते. त्यामुळे जमावाने दंगलीची पूर्ण तयारी केली होती असाही आरोप होत आहे. या संपूर्ण घटनाक्रमामध्ये तब्बल ४८ गाड्यांचे नुकसान झाले. यात दोन क्रेन जळाल्या आहेत. तर अनेक गाड्यांचे पूर्ण नुकसान झाले आहे. ४८ गाड्यांमध्ये काही चारचाकी तर काही दुचाकी असल्याची माहिती आहे.