नागपूर : शाळेच्या पहिल्या दिवशी लहान मुलांना फुल, चॉकलेट, खेळणीसह इतरही वस्तू देऊन त्यांचे स्वागत केले जाते. नागपूर जिल्ह्यातही असेच झाले. परंतु मुले शाळेत असतांनाच पहिल्या दिवशीपासून वैद्यकीय पथकाकडून विद्यार्थ्यांची तपासणी सुरू केली गेली. त्याच्या कारणाबाबत आपण जाणून घेऊ या.
नागपूर जिल्यात जिल्हा खनिज प्रतिष्ठानाकडून मंजूर झालेल्या अनुदानातून दवाखाना आपल्या दारी ही नाविण्यपुर्ण योजना राबविण्यात येत आहे. ही योजना राबवणारा नागपूर हा राज्यातील एकमात्र जिल्हा आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेतून समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांना गुणवत्तापुर्वक आरोग्य सेवांची उपलब्धता करुन दिली जात आहे.
शासनाने आरोग्य विभागाला आरोग्याशी संबंधित विविध उद्देश पुर्तता करण्यासाठी गावपातळीवर विविध आरोग्य कार्यक्रम जसे माता व बाल संगोपन कार्यक्रम, असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम, राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम, राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम, सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम राबवण्याचे आदेश दिले आहे.
हे कार्यक्रम नागपूर जिल्ह्यात सुरु असुन त्यानिमित्त आरोग्य कर्मचारी प्रत्येक गावात जाऊन वेगवेगळया वेळेस सर्वेक्षण करुन अथवा शिबीर घेऊन सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेतात. या विविध उपक्रमांसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना एकाच गावत विविध कार्यक्रमातंर्गत वारंवार जावे लागते. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर याचा ताण पडत असतो. त्यामुळे दवाखाना आपल्या दारीच्या चमूकडून हे विविध आरोग्य कार्यक्रम एकाच दिवशी गावात जाऊन राबवण्याच्या नावीन्यपूर्ण कल्पणेवर काम सुरू झाले आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी व गुणवत्तापुर्ण ठरत असल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे.
जिल्ह्यात २८२ शाळांत शिबीरे
शाळा सुरू झालेल्या २३ जून २०२५ रोजीपासून नागपूर जिल्हयातील सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. मंगळवारपर्यंत पर्यत नागपूर जिल्ह्यातील एकुण २८२ ठिकाणी तपासणी शिबीरे घेण्यात आली. त्यात १७ हजार ३१५ विदयार्थ्याची सांसर्गीक व असांसर्गीक आजाराची आरोग्य तपासणी केली गेली. त्यापैकी आजारी व काही आजारची लक्षणे आढळलेल्या बालकांवर तातडीने औषधोपचार सुरू केला गेला. नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक शालेय बालकांची तपासणी या मोहिमअंतर्गत करण्याचा कृती आराखडा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रेवती साबळे यांनी तयार केला आहे.