नागपूर. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे शहर असलेल्या नागपूरात एकीकडे अंमली पदार्थ तस्करीला ऊत आला आहे. चोऱ्या – माऱ्या, खुनाच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. कायद्याचा धाकदपटशा कोणाला उरलेला नसताना आता ज्येष्ठ नागरिकही शहरात सुरक्षित नाहीत का असा प्रश्नही पडत आहे. आयुष्यभर मुलाबाळांच्या जबाबदाऱ्यांचे ओझे पेलता पेलता स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याने साधे मॉर्निंग वॉकला निघालेल्या एका ज्येष्ठासोबत घडलेल्या वाटमारीच्या घटनेने हा सवाल उपस्थित केला आहे.
नेहमी प्रमाणे सकाळी सातच्या सुमारास मॉर्निंग वॉकला निघालेले ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक दशरथ धोंडीबा बरघट यांच्यासोबत हा प्रकार घडला. कैलास नगर येथील रहिवासी दशरथ हे दररोज सकाळी फेरफटका मारायला निघतात. नेहमीप्रमाणे ते रविवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडले. दशरथ हे मानेवाडा मार्गावरील वेणू कॉर्नरवर येताच पाठीमागून दुचाकीवर आलेले दोन भामटे त्यांच्याजवळ आले. आपण पोलिस असल्याची बतावणी करीत या दोघांनी दशरथ यांना आम्ही एका दागीने चोर महिलेचा शोध घेत असल्याचे सांगितले.
अचानक झालेल्या या प्रकाराने दशरथही भांबावले. मात्र त्यांची देहबोली पाहून या दोघांवर दशरथ यांचा विश्वास बसला, सौजन्याचे नाटक करीत या दोघांनी आपल्या जवळचा रुमाल काढून देत दशरथ यांना गळ्यातील सोन्याची चेन आणि बोटातील अंगठी रुमालात बांधून ठेवण्यास सांगितले. त्याच वेळी दशरथ यांची नजर चुकवून दोघांनीही दागीने बांधून ठेवलेल्या रुमालाची पोटली बदलवली. चार पावले पुढे गेल्यानंतर दशरथ यांनी रुमालाची गाठ सोडली असता त्यात दागीने नसल्याचे त्यांना दिसले. आपण लुटले गेली आहोत, हे लक्षात येताच त्यांनी अजनी पोलिस ठाणे गाठत दाद मागितली. मात्र तोवर दुचाकीवरून आलेले भामटे बेफाम वेगात दूरवर पसार झाले. दशरथ बरघट यांनी आयुष्यभर पोटाला चिमटा काढत पै -पै साठवून जमा केलेल्या सोन्याचे दागीने एका क्षणात लूटत या भामट्यांनी ज्येष्ठांच्या मॉर्निंग वॉकवरही आता प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
सकाळी दागिन्यांचा मोह टाळा
वर्दळ कमी असल्याचे दागीने हिसकावण्याचे प्रकार प्रामुख्याने सकाळी घडतात. त्यात ज्येष्ठ नागरिक, महिला हे मागे धावू अथवा विरोध करू शकत नाहीत. भामट्यांसाठी हे सॉफ्ट टार्गेट असते. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक असलेल्या ज्येष्ठांनी सकाळी प्रभात फेरीला निघण्यापूर्वी दागीने घरीच सुरक्षित ठेवून मोह टाळावा. समोरची व्यक्ती अनोळखी असेल तर त्यावर पटकन विश्वास ठेवू नका.