नागपूर : दोन विद्यार्थ्यांनी अगदी क्षुल्लक कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केली. नवीन कामठीत मुलाने कांदा पोहे खाण्यावरून आईशी वाद झाल्यानंतर आत्महत्या केली तर दुसऱ्या कळमेश्वरमधील मुलाने मोबाईल घेऊन न दिल्याचा राग आल्याने आत्महत्या केली. पहिल्या घटनेत, पीयूष लल्लनसिंह कुशवाह (१६, कन्हान, पींपरी) हा भोयर महाविद्यालयात मॅकेनिकल पदविकेची शिक्षण घेत होता. तो शिघ्रकोपी असून नेहमी चिडचिड करायचा. १ डिसेंबरला सकाळी साडेनऊ वाजता पीयूषच्या आईने नाश्त्यासाठी कांदा-पोहे बनविले. पीयूषने पोहे खाण्यास आईला नकार दिला. त्यानंतर आजोबाला पोहे नेऊन देण्यास पीयूषला सांगितले. त्यामुळे पीयूषने आईशी वाद घातला.
‘मी घरात एकटाच काम करतो. त्यामुळे सर्व जण मलाच काम सांगतात.’ असे बोलून त्याने आईशी वाद घातला. त्यानंतर तो घर सोडून निघून गेला. तो रात्रीपर्यंत परतला नाही. त्यामुळे त्याचा कुटुंबियांनी शोध घेतला. तो मिळून न आल्याने कन्हान पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस शोध घेत असतानाच पीयूषचा मृतदेह नवीन कामठी परीसरातील साई मंदिराच्या विरुद्ध दिशेला असलेल्या रेल्वेच्या बोगद्याच्या बाजुला असलेल्या झाडावर गळफास घेतलेल्या स्थितीत एका युवकाला दिसून आला. त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मिसींगच्या नोंदीवरून पीयूषच्या कुटुंबियांचा शोध घेतला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
हेही वाचा : अमरावती : कारागृहात चेंडू फेकून चॉकलेटसह गांजाचाही पुरवठा!
दुसऱ्या घटनेत, दीपांशू पुनाराम साहू (१६, रा.मोहळी, कळमेश्वर) हा अकराव्या वर्गाचा विद्यार्थी आहे. त्याचे आईवडिल मूळचे मध्यप्रदेशातील छिंदवाडा शहराजवळील एका खेड्यातील आहे. ते कामाच्या शोधात नागपुरात आले होते. दीपांशू याच्या कॉलेजमधील सर्वच मुलांकडे स्मार्टफोन आहे. त्यामुळे दीपांशूने वडिलांना स्मार्टफोन विकत घेऊन मागितला. आर्थिक स्थिती योग्य नसल्यामुळे वडिलांनी फोन घेऊन देण्यास असमर्थता दर्शविली होती. त्यामुळे निराश झालेल्या दीपांशूने मोहळी येथील भाऊराव चौधरी यांच्या शेतातील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.