नागपूर: सात वर्षांत उत्तर प्रदेशात एकही दंगल झालेली नाही. कारण दंगा करणाऱ्यांना हे चांगले माहिती आहे की उलटे टांगले जाईल, असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. नागपूर लोकसभेचे उमेदवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी पश्चिम नागपूर परिसरात आयोजित जनसभेला संबोधित आदित्यनाथ बोलत होते.

आज उत्तरप्रदेशात संचारबंदी लागत नसून कावड यात्रा काढली जाते. आधी मुली बाहेर राज्यात शिक्षणासाठी जायच्या. मात्र आता अपराधी, गुंड हे राज्य सोडून गेले आहेत. सर्वांसाठी सुरक्षित वातावरण आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज विविध भागांमध्ये सभा घेताना ज्यांनी रामाला आणले त्यांनाच सत्तेत आणण्याचा निर्धार जनतेने केल्याचे दिसून येत आहे. आज मोदींच्या नेतृत्वात देशात राष्ट्रवादी सरकार असल्याने ५०० वर्षांचा वनवास संपून राम मंदिर उभे राहिले. याआधी प्रत्येक होळीच्या सणाला ‘होली खेले रघुवीरा अवध मे..’ हे गाणे वाजत होते. मात्र, यावर्षी पहिल्यांदा रामलल्ला खऱ्या अर्थाने अयोध्येत होळी खेळले. हा आमच्यासाठी भाग्याचा क्षण असून मोदी सरकारच हे करू शकते, असेही आदित्यनाथ म्हणाले. या सभेला नितीन गडकरी, माजी आमदार सुधाकर देशमुख, परिणय फुके, माजी महापौर संदीप जोशी, दयाशंकर तिवारी आदींची उपस्थिती होती.यादरम्यान मोदी सरकारच्या विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली. नितीन गडकरी यांनीही मतदारांना संबोधित केले.

हेही वाचा : नागपूर: वाहन चोरायचे अन् डान्सबारमध्ये पैसे उडवायचे…

गडकरी अजातशत्रू

नितीन गडकरी यांनी नागपूरसह संपूर्ण देशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत भारताची चर्चा जगभरात होऊ लागली आहे. देशाने गेल्या दहा वर्षांमध्ये जी प्रगती केली त्यात नितीन गडकरी यांचे योगदान मोठे आहे. गडकरींनी केवळ नागपुरात नाही संपूर्ण देशात पायाभूत सुविधांचा विकास केला आहे. त्यांच्याकडे नाही हा शब्दच नाही. प्रत्येक राज्यांना त्यांनी कोट्यवधींचा निधी देऊन कामे केलीत. राजकारणात गडकरींविषयी कुणीही नकारात्मक बोलत नाही. गडकरी हे राजकारणातले अजातशत्रू आहेत. नागपूरकरांना असे खासदार मिळणे ही नशिबाची गोष्ट असल्याचेही आदित्यनाथ म्हणाले.