नागपूर : शहरातील विविध ठिकाणांवरून दुचाकी चोरी करुन मिळालेल्या पैशातून डान्सबारमध्ये नृत्य करणाऱ्या तरुणींवर पैशांची उधळण करणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हे शाखेने अटक केली. विल्सन जेम्स (४०)रा. मोहननगर आणि सोहेल खान (२२) रा. जाफरनगर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्या जवळून चोरीची एकूण सहा वाहने जप्त केली.

चोपडे लॉन जवळ राहणारे फिर्यादी प्रकाश कश्यप (५९) हे २८ मार्चला महानगर पालिकेच्या मुख्य कार्यालयात गेले. दुपारच्या सुमारास त्यांनी जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयासमोर वाहन केली. काम आटोपून आल्यानंतर त्यांनी नियोजित स्थळी त्यांचे वाहन दिसले नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेतला तसेच विचारपूस केली. मात्र, वाहन मिळाले नाही. अखेर त्यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार केली.

हेही वाचा : यवतमाळमध्ये ‘वंचित’चा उमेदवार निवडणुकीपासून ‘वंचित’च; उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास…

सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता मनपा कार्यालयातून वाहन चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. अधिक तपासात सदर, पाचपावली, नंदनवन, मानकापूर आणि सावनेर परिसरातून एकूण सहा वाहने चोरी केल्याचे सांगितले. त्यांच्या जवळून २ लाख १० हजार रुपये किंमतीचे सहा वाहने जप्त करण्यात आली. पुढील कारवाईसाठी आरोपींना सदर पोलिसांच्या सुपूर्द केले. चोरीच्या मुद्देमालातून ते डान्सबारमध्ये पैसे उडवत असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. ही कारवाई पोलीस उपायुक्त निमित गोयल यांच्या मार्गदर्शनात दिनेश ठवरे, प्रवीण शेळके यांनी केली.