नागपूर : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज पत्रकार परिषदेत थेट आरोप करत एक गंभीर विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलिसांनी तज्ज्ञांच्या फॉरेन्सिक अहवालाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आणि राजकीय दबावाखाली ‘बी समरी’ अहवाल न्यायालयात सादर केला. हा दबाव खुद्द मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या फडणवीस यांच्याकडून आल्याचा आरोप देशमुख यांनी केला.

देशमुख यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या वाहनावर दगडफेक झाल्याचा प्रकार खोटा ठरवण्यासाठी पोलिसांनी संगनमताने तपास मोडीत काढला. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या अहवालात दोन व्यक्तींनी वेगवेगळ्या दिशेने दगड मारल्याचे नमूद असून, त्यामुळे गाडीच्या काचा फुटल्या आणि त्यांना डोक्याला जखम झाली. हे स्पष्ट असूनही पोलिसांनी हा अहवाल बाजूला ठेवून एका खाजगी कंपनीच्या व्यवस्थापकाचे मत घेऊन ‘घटना घडलीच नाही’ असा अहवाल (‘बी समरी’) तयार केला.

“फॉरेन्सिक अहवालानुसार हल्ला झाल्याचे स्पष्ट दिसते. पण, तरीही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करत खोटा अहवाल न्यायालयात सादर केला. पोलिसांना फॉरेन्सिक अहवालावर स्वतःहून वैज्ञानिक मत मांडण्याचा अधिकार नाही. मात्र, त्यांनी तसे करत ‘बी समरी’मध्ये चुकीची माहिती दिली,” असे देशमुख म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “पोलीस अधीक्षकांनी तपास पूर्ण होण्याआधीच पत्रकार परिषद घेऊन, विरोधकांच्या आरोपांप्रमाणेच हल्ला खोटा असल्याचे भासवले. हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या राजकीय दबावाखाली घडल्याचे स्पष्ट आहे. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल मिळाल्यानंतरही पुन्हा गुन्हा दृश्याचे पुनर्निर्माण करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबवर दबाव टाकण्यात आला.”

देशमुख यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी करत म्हटले की, “फॉरेन्सिक अहवाल बदलण्यासाठी दबाव आणणाऱ्यांवर आणि खोटा अहवाल सादर करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. हे प्रकरण केवळ पोलीस तपासातील गोंधळ नाही, तर त्यामागे सत्ताधारींचा राजकीय हस्तक्षेप असल्याचे गंभीर निदर्शक आहे.”

या प्रकरणामुळे राज्याच्या प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, देवेंद्र फडणवीस यांच्यावरही राजकीय दबाव टाकल्याचा आरोप लावण्यात आला आहे. आता या आरोपांवर सरकार किंवा फडणवीस काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.