नागपूर : शहरातील सर्वाधिक लांबीचा उड्डाणपूल म्हणून कस्तूरचंद पार्क मैदानाजवळील पुलाची गणना होते. या उड्डाणपुलामुळे शहराबाहेर जाण्याचा मार्ग जरी सोपा झाला असला तरी पुलाचे नियोजन चुकले आहे. उड्डाणपुलाचे लँडिंगची जागा चुकल्यामुळे वाहनचालक नेहमी संभ्रमात असतात. एका बाजुचा रस्ता बंद केल्याने वाहतूक कोंडी होत असून सामान्य नागरिकांनासाठी त्रासदायक ठरत आहे.
संविधान चौकापासून मानकापूर क्रीडा संकुलापर्यंत दररोज होणारी वाहनांची गर्दी या भागातील नागपूरकरांसाठी डोकेदुखी ठरली होती. मार्च २०१९ मध्ये रिझर्व्ह बँक चौक ते मानकापूर चौकापर्यत उड्डाण पूल बांधला, काटोलकडे जाण्यासाठी या पुलावरून वेगळा मार्ग करण्यात आला. पण हा पूल झाल्यावरही पूर्वीच्या सदर मार्गावरील गर्दी काही कमी झाली नाही. पुलाचा आराखडा चुकल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली.
हेही वाचा…वर्धा : गावठी दारू फॅक्टरी; ‘किक’ येण्यासाठी युरिया अन…
संविधान चौकातून पुल सुरू होतो एक मार्ग काटोल नाका चौक व दुसरा मार्ग मानकापूर क्रीडा चौकाकडे जातो. पूर्वी संविधान चौकातून एलआयसी चौकाकडे जाण्यासाठी रस्ता होता. तो आता बंद करण्यात आला. त्यामुळे आता संविधान चौकातून कामठीमार्गावर जायचे असेल तर लिबर्टी टॉकीज चौकातून वळण घ्यावे लागते. या चौकात नागरिकांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. लिबर्टी चौकापूर्वीच खासगी बस आणि ऑटोचालकांची मोठी गर्दी असते. अरुंद असलेल्या रस्त्यावरून जाताना खूप मोठी कसरत करावी लागते.
ज्यांना सदर किंवा परिसरातील बाजारपेठेत जायचे असेल तर त्यांना पुलावरून जाण्याचा काहीही उपयोग होत नाही. ज्यांना थेट मानकापूर किंवा त्यापुढे जायचे असेल किवा काटोल मार्गावर जायचे असेल तेच पुलाचा वापर करतात. यापैकी ज्यांना काही खरेदी करायची असेल तर ते पुलाचा वापर करीत नाही. त्यामुळे पुल झाला पण वाहतूक कोंडी कायम असे सध्याचे चित्र आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इमारतीच्या मागे लँडिंगच्या सदोष डिझाइनमुळे राष्ट्रीय महामार्गावर अडथळा निर्माण झाला आहे. सदर परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी या उड्डाणपुलाचा उद्देश होता. परंतु,उड्डाणपूलाचा सामान्य नागरिकांना फारसा उपयोग होताना दिसत नाही .
हेही वाचा…राज्यात वीज चिंता! कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ७ कायम संघटनांची उडी
कठडे लावून थेट रस्ता बंद
रिझर्व बँक चौकातून एलआयसी चौकाकडे जाण्यासाठी पूर्वी थेट मार्ग होता. मात्र, उड्डाणपुलाची निर्मिती झाल्यानंतर पुलावरील वाहतूकीमुळे चौकात कोंडी होत होती. त्यावर कोणतीही उपाययोजना वाहतूक पोलिसांकडे नव्हती. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात पोलिसांनी बॅरिकेड लावून एलआयसी चौकाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद केला. आता एलआयसी चौकात जरी जायचे असले तरी दोन किमीचा फेरा घेऊन जावे लागते.
रिझर्व बँक चौकापासून ते मानकापूर क्रिडा चौकापर्यंतच्या उड्डाणपुलाचे नियोजन पुरते चुकले आहे. नागपूरकरांसाठी हा पूल फारसा उपयोगाचा नाही. पुलाची लँडिंग चुकली असून त्या पुलावर चढण्यासाठी जागा पण अरुंद आहे. वाहतूक पोलीस आणि महापालिकेने गांभीर्य दाखविल्यास थोडाफार दिलासा नागरिकांना मिळू शकतो. पुलाच्या लँडिंग ठिकाणी वाहतूक कोंडी ही कायमचीच असणार आहे. नागपूरकरांना त्या वाहतूक कोंडीची सवय करून घ्यावी लागेल.– विवेक रानडे (कॅग समूहाचे सदस्य)
संविधान चौकाकडून सदरमधील मंगळवारी बाजार किंवा छावणी परिसरात जाताना दुचाकीस्वारांना छोटेसे अंतर पार करण्यासाठी दोन किमीचे अंतर कापावे लागते. रिझर्व बँक चौकातून निघाल्यानंतर उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच मोठी वाहतूक कोंडी असल्यामुळे हा रस्ता नेहमी त्रासदायक वाटतो. – मयूरी उंदिरवाडे (दुचाकीस्वार)
हेही वाचा…चिंता वाढली; अमरावती विभागातील धरणांमध्ये ५१ टक्के पाणीसाठा
कस्तूरचंद पार्कजवळून सुरु होणाऱ्या उड्डाणपुलाच्या चौकात एका बाजुची वाहतूक पूर्णपणे बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आली आहे. त्या चौकात नेहमी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. पोलीस तत्परता दाखवत वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. – जयेश भांडारकर, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग.