नागपूर : नागपूरसह विदर्भाच्या बऱ्याच भागात पावसामुळे वृक्ष वीजवाहिन्यांवर पडणे, पावसाचे पाणी शिरून वीज यंत्रणेत बिघाडामुळे वीज वारंवार खंडित होत आहे. अशातच महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते, अधिकारी कृती समितीने विद्युत क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात ९ जुलैला संप पुकारल्याने वीज यंत्रणाच सलाईनवर राहणार आहे. महावितरणकडून मात्र ते सज्ज असल्याचा दावा करण्यात आला आहे.
नागपुरातील शहरी व ग्रामीण भागात मागील दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. पावसाच्या तडाख्यात शहरी व ग्रामीण भागातील बऱ्याच भागात वीजवाहिन्यांवर वृक्ष वा त्यांच्या फांद्या पडल्याने वीज तार तुटणे, खांब वाकणे, वीज वितरण पेटीत तांत्रिक बिघाड, पावसाचे अतिरिक्त पाणी शिरून वीज यंत्रणेत बिघाड होत आहे. त्यामुळे वीज बऱ्याचदा खंडित होऊन ग्राहकांना मनस्ताप होत आहे. महावितरण कर्मचारी समस्या उद्भवताच दुरुस्ती करतात. परंतु, हल्ली वीज जाण्याचे प्रमाण वाढल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत.
दरम्यान, विद्युत क्षेत्रातील खासगीकरणाविरोधात महावितरण, महानिर्मिती, महापारेषण कंपनीतील अधिकारी, कर्मचारी, अभियंत्यांच्या सहा संघटनांकडून महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते, अधिकारी कृती समितीच्या बॅनरखाली बुधवारी संप घोषित केला आहे. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्रीनंतर कामगार संपावर जाण्याचा धोका आहे. आधीच वारंवार वीज खंडित होण्याचा धोका असताना कामगारांअभावी वीज यंत्रणा विस्कळीत झाल्यास ग्राहकांचा मनस्ताप वाढण्याचा धोका आहे.
दरम्यान, महावितरणने आवश्यक काळजी घेत आपत्कालीन स्थितीतील सर्व व्यवस्था सज्ज केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे ग्राहकांना घाबरण्याचे कारण नसून वीज यंत्रणा सुरळीत राहणार असल्याचे म्हटले आहे.
भारतीय मजदूर संघ संपात नाही
केंद्र सरकार कामगार कायदे नष्ट करू पाहत असल्याचा आरोप करत देशातील विविध कामगार संघटनेच्या राष्ट्रीय ट्रेड युनियनने संयुक्त कृती समितीच्या बॅनरखाली ९ जुलैला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. दरम्यान ईपीएस ९५ च्या निवृत्ती वेतनात वाढीवर केंद्रासोबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. दुसरीकडे आठवा वेतन आयोगाची समितीही केंद्राने गठित केली आहे. फोर व्हेज कोड कायद्यातील किमान वेतन कायदा व सामाजिक सुरक्षा कायदा या दोन व्हेज कोडमध्ये कामगारांचे हित लक्षात घेता भारतीय मजदूर संघानेते तात्काळ लागू करण्याची मागणी केली आहे. उर्वरित दोन वेज कोडमध्ये सुधारणा दर्शवली आहे. सरकार कामगारांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करीत असल्याने भारतीय मजदूर संघ ९ जुलैच्या संपात सहभागी होणार नाही, असे भारतीय मजदूर संघाने प्रसिद्धीपत्रकातून कळवले आहे.