वर्धा : शिक्षण शुल्क भरू नं शकल्याने कोंडी झालेल्या विद्यार्थिनीने आत्महत्या करण्याची बाब समाजमन सुन्न करणारी ठरत आहे. देवळी तालुक्यातील लोणसावली गावातील सोनिया वासुदेव उईके या १७ वर्षीय मुलीची आत्महत्या चर्चेत आली असून नेमके काय घडले, याची पोलीस चौकशी करीत आहे. पौगंडावस्थेत मुलं विशेष भावनिक असतात. मनासारखे झालेच पाहिजे, अशी जिद्द असते. ही जिद्द पूर्ण करण्यास पालक पण अनुकूल असतात. कारण जिद्दीपोटी मुलं काय करतील, याचा भरवसा नसल्याची भूमिका पालकांच्या मनात असते.
या प्रकरणात आत्महत्या घडलेले कुटुंब अत्यंत सामान्य स्थितीतील आहे. वडील शेतमजुरी करतात तसेच अधिकचे दोन पैसे मिळावे म्हणून इतरांची शेती पण मक्त्याने करतात. मुलगा पण कामावर जातो. मुलगी सोनिया ही वर्धेतील न्यू इंग्लिश हायस्कुल मध्ये शिकत होती. आदिवासी शासकीय वसतिगृहात राहून तिने अकरावी पूर्ण केले. त्यानंतर ती घरी आली होती. नवे शैक्षणिक सत्र सुरू न झाल्याने ती घरीच थांबली. त्याच वेळी शाळेत बारावीच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली. तिने प्रवेश लवकर व्हावा म्हणून तगादा सुरू केला. तेव्हा काही दिवस थांब, प्रवेश घेऊन देतो, असे पैश्याची अडचण असल्याने समजावून सांगितले.
आठ दिवस गेले. परत तिने प्रवेशाची घाई सुरू केली. तेव्हा वडिलांनी करतोच, थांब थोडी असे म्हटले. मात्र त्यामुळे सोनिया चिंतेत पडली. घटनेच्या दिवशी आई, वडील व भाऊ हे कामावर गेल्याचे पाहून हताश मनस्थितीत आत्महत्या केल्याचा घटनाक्रम सांगितल्या जातो. वडील कामावरून घरी आल्यावर दार उघडेच दिसले. तसेच घरात कोणीच दिसून आले नाही. मुलगा घरी आल्यावर त्याने घराच्या मागील भागात डोकावले. तेव्हा त्यास बहिण सोनिया ही बाथरूममध्ये गळफास लावून लटकत असल्याचे दिसले.
यामुळे घरात आकांत पसरला. घटनेची माहिती पुलगाव पोलिसांना देण्यात आली. आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. नेमके कारण काय, म्हणून पोलिसांनी बारकाईने तपास सूरू केला. कारण मुलींना मोफत शिक्षण असून आता तर व्यावसायिक शिक्षण पण मोफत लागू झाले आहे. खाजगी क्लासची मोठी फी भरायची, तर ते पण कारण ठरत नाही. कारण ती कॉमर्स शाखेत होती. वसतिगृहाचे पण शुल्क नाही. तेव्हा अडचण काय याची विचारपूस सुरू झाली.
आमदार राजेश बकाने हे म्हणतात की मी तपास अधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आहे. आर्थिक अडचण हे कारण मुळीच नसल्याचे सांगण्यात आले. मी अधिवेशनासाठी मुंबईत आहे. परत आल्यावर स्वतः तपासतो. त्या कुटुंबाबाबत मला पूर्ण सहानुभूती आहे. अपेक्षित ते सर्व सहकार्य करू. होतकरू, अभ्यासू मुलीचा जीव जाण्याची बाब वेदनादायीच, अशी भावना आमदार बकाने व्यक्त करतात.
खासदार अमर काळे हे पण या कुटुंबास घरी भेटून आले. आस्थेने विचारपूस करीत त्यांनी आर्थिक मदत पण दिली. त्यांच्यासोबत भेटीवेळी असलेले काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर हे सांगतात की मुलीची आत्महत्या या कुटुंबास मोठा आघात देणारी ठरली आहे. क्षुल्लक कारणासाठी मुलगी एवढे टोकाचे पाऊल उचलेल, असे त्यांना वाटले नव्हते.
प्रश्न फी चा नव्हताच. हॉस्टेलवर जाण्यापूर्वी मुलं घरून तयारी करून निघतात. कपडे, घरगुती वस्तू व अन्य साहित्य नेतात. त्यासाठी पैसे हवे होते. त्यातच प्रवेश झालेल्या मैत्रिणींचे फोन यायचे, केव्हा येते म्हणून. पण तयारीच पूर्ण न झाल्याने ती अस्वस्थ झाली असावी, असे ऐकायला मिळत असल्याचे चांदुरकर सांगतात. मुलांच्या खात्यात आता थेट पैसे जमा होतात. पण शुल्कचा मुद्दा चर्चेत आला. मुलीस असलेली शिक्षणाची आवड, दहावीत पडलेले ७५ टक्के मार्क्स, घरची स्थिती बेताची पण पुढे जाण्याचे ध्येय यामुळे ही आत्महत्या परिसरात हळहळ व्यक्त करणारी ठरत आहे.