वर्धा : व्यावसायिक प्रगतीसाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता मांडल्या जाते. असे मनुष्यबळ उपलब्ध नसेल तर आधुनिक औद्योगिक विकास मंदावतो. त्याची उपलब्धता करून देण्याचे कार्य राजकीय नेतृत्वास करावे लागते. याच संकल्पनेतून जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाचे कौशल्य विकास केंद्र जिल्ह्यात आणण्याकरिता पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून विद्यापिठाकरीता १० एकर जागा मंजूर करण्यात आली आहे.

सोबतच या केंद्राचे कामकाज करण्याकरिता आवश्यक असलेल्या वास्तुंची उपलब्धता तसेच पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील बांधकामाकरिता १८५ कोटी रुपये देण्यात येणार आहे.या केंद्रात केवळ जिल्हातील नव्हे तर विदर्भात असलेल्या विविध रोजगाराकरिता कुशल हात निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

राज्याचे गृह (ग्रामीण), प्राथमिक शिक्षण, सहकार, खनिकर्म आणि गृहनिर्माण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांनी वर्ध्यात कुशल कामगार निर्माण व्हावे याकरिता कौशल्य विकास केंद्र उभारण्याचा प्रस्ताव यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्याकडे सादर केला होता. त्याला मुक्त विद्यापीठाकडून हिरवी झेंडी देण्यात आली आहे. या व्यवसाय कौशल्य केंद्रला मान्यता देताना विद्यापीठाच्या कुलगुरुंनी वर्धा जिल्हा व एकूण विदर्भाचा शैक्षणिक अनुशेष भरून काढण्याकरिता हे केंद्र कार्यरत राहणार असल्याचे म्हटले आहे.

वर्धा येथील विद्यापीठाला प्राप्त जागेवर सविस्तर असे शैक्षणिक संकुल उभे करणे हा विद्यापीठाचा मुख्य हेतु आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठ स्वनिधीतून भांडवली खर्च करणार आहे. तसेच शासनाच्या आर्थिक मदतीने सदर शैक्षणिक संकुल पुर्णत्वास नेण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. त्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सदर संकुल व व्यावसायिक कौशल्य विकास केंद्र महाराष्ट्रात उच्च दर्जाचे कौशल्य शिक्षण देणारा एक अग्रगण्य परिसर ठरणार आहे.

महात्मा गांधी यांचे शहराकडून खेड्याकडे चला हे स्वप्न पुर्णत्वास नेण्याकरिता या विदर्भाचा जाणीवपूर्वक शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकास होणे प्रासंगीक ठरते. या ठिकाणी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाचे विभागीय कार्यालय आणि निवासी व अनिवासी व्यावसायीक कोशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहे. या भागात असणाऱ्या शेती आणि शेती पूरक इतर लघु उद्योगांना पुरेशा प्रमाणात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यानी सांगितले आहे.

स्थानिक गरजा पूर्ण करणे, रोजगार निर्मिती, उद्योग शिक्षण समन्वय, जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी अंतर्गत वाढवण पालघर येथील बंदरासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करणे, ई वाहन दुरुस्तीसाठी वर्कशाप स्थापन करणे, लॉजिस्टिक पार्क निर्माण करणे, सर्वांसाठी शिक्षण, आदिवासी शिक्षण, संशोधन व विकास, कुटीर उद्योग प्रशिक्षण, प्रादेशिक भाषा अभ्यासक्रम, दिव्यांकरिता व्यावसायिक शिक्षण संधी, डिजिटल लर्निंग सेंटर, डिजिटल लर्निंग प्रयोगशाळा आदींच्या माध्यातून कामे करण्यात येणार आहे.

याठिकाणी इमारतींचे बांधकाम होणार असून त्यात विभागीय कार्यालय, व्यावसायिक व उद्योजकता विकास केंद्र, शैक्षणिक इमारत, सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासिका व संगणकीय लॅब, डिजिटल लर्निंग व दिव्यांगांसाठी प्रयोगशाळा, लॉजिस्टीक पार्क इमारत, स्वयंअध्ययन साहित्य भांडार या इमारती पहिल्या टप्प्यात बांधण्यात येणार आहेत. यावर ११५ कोटी खर्च करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांसाठा दोन वसतीगृह, इन्डोअर स्पोर्ट कॉम्प्लेक्स, विद्यार्थी भवन, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थाने या इमारती बांधण्यात येणार आहे.