वर्धा : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यात भाजपचे आमदार पुढे होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणा केली नाही. तर ३२ हजार कोटी रुपयाचे मदतीचे पॅकेज जाहीर केले. ते सर्वसमावेशक व इतिहासातील सर्वात मोठे असल्याचा दावा केला होता.

आज जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांना या संदर्भात विचारणा करण्यात आली. तेव्हा ते म्हणाले की, ओला दुष्काळ जाहीर करण्याची बाब परिस्थिती पाहून अंमलात येवू शकते. तो मुद्दा पूर्णपणे बाजूला सारण्यात आलेला नाही. जाहीर झालेली मदत तत्पर देण्याचा प्रयत्न आहे. यात एकही आपत्तीग्रस्त शेतकरी मदत वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दुष्काळाच्या मदतीसंदर्भात डॉ. भोयर यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळेस आमदार राजेश बकाने, आमदार दादाराव केचे, माजी खासदार रामदास तडस, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय गाते व सेनेचे राजेश सराफ उपस्थित होते.जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले डॉ. भोयर पुढे म्हणाले की शेतकऱ्यांना मदत देणारे राज्याच्या इतिहासातील हे सर्वात मोठे पॅकेज आहे. २९ जिल्ह्यातील २५३ तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झाले. त्यासाठी ३१ हजार ६२८ कोटींचे हे पॅकेज असून ही मदत दिवाळीपूर्वी देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

वर्धा जिल्ह्यात मदतीसाठी १४२ कोटी रुपयाचा मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यात दीड लाख शेतकरी प्रभावीत झाले आहे. ४५ हजार हेक्टर शेतजमिनीस फटका बसला. अतिवृष्टीने बाधीत व पिकांवरील रोगांमुळे प्रभावीत झालेल्यांना मदत मिळणार आहे. जिल्हा नियोजन समितीचा ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे. जाहीर मदतीशिवाय आकस्मित मदत म्हणून हा नियोजन समितीचा निधी प्रसंगी वापरल्या जाणार. १०० टक्के पंचनामे झाल्याची आकडेवारी असली तरी कोणाची तक्रार असल्यास मदत करण्याची तयारी राहणार आहे. अश्या तक्रारी दिसून आल्यास संबंधीत अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई केल्या जाईल, असे डॉ. भोयर यांनी स्पष्ट केले. विरोधक मदतीचा आकडा फसवा असल्याचा आरोप करतात, असे नमूद केल्यावर डॉ. भोयर म्हणाले की विरोधक आरोप करणारच. त्यांनी मदतीचा एवढा मोठा आकडा कधी पाहला नसल्याने ते असे बोलतात, अशी टीका डॉ. भोयर यांनी केली.

काही ठिकाणी महसूल कर्मचारी हे वंचित शेतकऱ्यांना मोबाईलवरून नुकसान झाल्याचे फोटो काढून आणण्यास सांगत आहे. अनेकांजवळ असे मोबाईल नसल्याने ते मदतीपासून वंचित राहू शकतात, असे निदर्शनास आणल्यावर पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले की असे होत असल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करू. जिल्ह्यात देवळी व हिंगणघाट परिसरात अतिवृष्टीने सर्वाधिक नुकसान झाल्याची आकडेवारी आहे. आमदार राजेश बकाने म्हणाले की, देवळी तालुक्यात कोल्हापुरी बंधारे पूर्णतः उध्वस्त झाले असल्याने पावसामुळे मोठे नुकसान होत आहे.