वर्धा : येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ म्हणजे वादंगाचे व्यासपीठ, असे समीकरण ठरले आहे. चांगल्यापेक्षा वादग्रस्त घडामोडी, ही या विद्यापीठाची आता ओळख ठरणार काय, असा प्रश्न विचारल्या जात असतो. विद्यापीठ प्रशासनातील वाद, विद्यार्थ्यांची भांडणे, वैचारिक मतभेद अशा व अन्य स्वरूपात हे विद्यापीठ गाजत आले आहे. आता विद्यापीठ हॉस्टेलमध्ये आठवड्यापूर्वी घटना घडली. त्याचे पडसाद आता उमटत आहे. दहा विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करीत ही तक्रार केली आहे.
विधि शाखेतील ही घटना आहे. द्वितीय वर्षातील विद्यार्थी हे प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत करतात. त्यांची ‘फ्रेशर्स पार्टी’ झाली. तक्रारीनुसार शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी ‘फ्रेशर्स पार्टी’त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. त्याचा विरोध काही संकुचित वृत्तीच्या मुलांनी केला. तेव्हा डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा ठेवण्यास विरोध का, असा प्रश्न केला असता प्रतिमेबाबत अपशब्द काढण्यात आले. प्रतिमेचा अपमान करण्यात आला. आम्हास जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. आम्हास मारहाणही झाली. ही बाब गंभीर असून असे कृत्य करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात विविध कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
मारहाणीत अश्विनी सोनकर, चंद्रभान कोगे, ब्रजेश सोनकर, नेहाल आलम व अन्य विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. इतकेच नव्हे तर काही विद्यार्थी अद्याप धमकी देत आहे. या प्रकारमुळे आम्ही दहशतीत असल्याचे तक्रार करणारे विद्यार्थी म्हणतात. याप्रकरणी लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती या विद्यार्थ्यांनी केली.
हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. कुमुद शर्मा यांनी याप्रकरणी भाष्य करताना स्पष्ट केले की, हा केवळ विद्यार्थ्यांच्या दोन गटांतील वाद आहे. ही बाब गांभीर्याने हाताळली जात आहे. काही विद्यार्थ्यांची वसतिगृहातून हकालपट्टी करण्यात आली. तसेच याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई ठरवू.
विद्यापीठाचे कुलसचिव नवाज खान यांनी याबाबत लेखी स्पष्टीकरण देताना नमूद केले की, विद्यापीठ विकासकार्यात आघाडीवर आहे. नव्या कुलगुरू आल्यानंतर प्रशासनात बदल सुरू झाले आहेत. मात्र, काही बेजबाबदार तत्त्व हे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. तथ्यहीन माहिती प्रसारित करीत विद्यापीठास बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आमचे प्रशासन अशा बाबी गांभीर्याने घेत असून अनुचित प्रकार होवू देणार नाही. विद्यापीठाच्या विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी संभ्रमित करणाऱ्या माहितीवर लक्ष देवू नये.