वाशीम : महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. महिला बेपत्ता होण्याच्या १३ लाख तक्रारी आहेत. यातील ७ लाख महिला घरी परतल्या आहेत. पाच लाख महिलांचा शोध बाकी आहे. मी प्राधान्याने अत्यंत कठीण परिस्थितीत विदेशातून महिलांना सुखरूप घरी आणले. आणि कितीही अडचणी आल्या तरी त्यांना शोधण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली.

राज्य महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत वाशीम येथे आल्या असता त्यांनी लोकसत्ताशी बोलताना ही माहिती दिली. पुढे बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या की, महिलांच्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे महिला घरा बाहेर पडू शकत नाहीत. किंवा मुंबई येथे जावू शकत नसल्याने राज्य महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम राबवून राबवून आतापर्यंत ३१ जिल्ह्यातील महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. राज्यातच नव्हे देशात महिला तस्करीचे प्रमाण सर्वाधिक आहे. स्त्री भ्रूण हत्या आजही होत आहेत. राज्यात बाल विवाहाचे प्रमाण अधिक आहे. पण तक्रारी होत नाहीत. त्यासाठी विशेष कायदा करण्याचे प्रयोजन आहे. राज्यातील अनेक ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. परंतु ते बंद अवस्थेत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून त्यात तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा : बलात्कारी गुराख्याची माहिती देणाऱ्याला ५ लाखांचे बक्षीस; ७ दिवसांनंतरही आरोपी फरार

महिला आयोगाच्या माध्यमातून महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. महिलांवरील अन्याय, अत्याचार रोखणे, महिलांना उद्योग व्यवसाय उभे करून देणे. त्यांना स्वयंपूर्ण आणि सक्षम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे, निवासी उप जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.