यवतमाळ : बोगस कामगारांना मजूर असल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या कळंब व राळेगाव येथील संगणक चालकावर कामगार अधिकारी कार्यालयाच्या पथकाने नुकतीच धाड टाकली. यामध्ये बोगस प्रमाणपत्रांसह पंचायत समिती अधिकारी तसेच ठेकादारांची स्वाक्षरी असलेले कोरे अर्ज आढळून आले.
या प्रकरणी सुनील दयालराव ढोरे (३४) रा. शांतीनगर, राळेगाव तसेच प्रज्वल शिरसकर (२५) रा.कळंब या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेत विविध योजनांचा फायदा घेण्यासाठी मोठ्या संख्येने बोगस मजुरांची नोंदणी झाली आहे. याबाबत पंधरा दिवसांपूर्वी ‘लोकसत्ता’ने बोगस मजुरांच्या लक्षणीय आकड्यासोबतच पेटी व गृहोपयोगी वस्तूंच्या वाटपात होणाऱ्या गैरप्रकारावर वृत्त प्रकाशित केले होते.
आता ही कारवाई झाल्याने या योजनेतील अनागोंदीवर मोहोर उमटली. कामगार मंत्री प्रधान सचिव (कामगार), सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बोगस बांधकाम कामगार प्रमाणपत्र प्रकरणी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार कामगार उपआयुक्त चंद्रकांत राऊत यांनी बांधकाम कामगारांच्या बोगस कागदपत्रांद्वारे होणाऱ्या नोंदणीबाबत अमरावती विभागाची बैठक घेऊन दक्षता पथके गठित केली. बोगस नोंदणी करणारे दलाल, संशयित व्यक्तींविरोधात कारवाईच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात कामगार अधिकारी राहुल काळे यांच्या मार्गदर्शनात राजेश वनारे व सतीश देशमुख यांनी राळेगाव येथील नाविन्य कॉम्प्युटर व कळंब येथील साई कॉम्प्युटरमध्ये धाड टाकली. त्यावरून राळेगाव व कळंब पोलीस ठाण्यात राजेश वनारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ही योजना सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली आहे. मोठ्या संख्येने यात गैर मजुरांचा भरणा झाला आहे. बोगस मजूर होणे अतिशय सोपे असल्याचे वातावरण जिल्ह्यात आजही आहे. दलाल घरोघरी जाऊन महिलांची बैठक घेतात. बोगस मजूर होण्यासोबतच योजना नुतनीकरण, पेटी, शिष्यवृत्ती, गृहोपयोगी वस्तू, लग्नासाठी आर्थिक मदत यासारख्या योजनांचा लाभ मिळवून देण्यसाठी हे दलाल लोकांकडून आजही पैसे उकळत आहे. बनावट कागदपत्रांना तयार करण्यात कॉम्पुटर चालक आघाडीवर आहे.
आजपर्यंत होणारा गैरप्रकार का खपवून घेतला?
कळंब येथील साई कॉम्प्युटर व राळेगावातील नाविन्य कॉम्प्युटरच्या माध्यमातून कामगार नोंदणीचे बनावट प्रमाणपत्र दिले जात असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार धाड टाकण्यात आली. यामध्ये राळेगाव येथील संगणक दुकानात ९० दिवसांचे बनावट प्रमाणपत्राशी संबंधित ६० कागदपत्रे ताब्यात घेण्यात आले आहे. यासोबतच साई सेंटरमध्ये कळंब नगर पंचायतमधील अधिकाऱ्यांनी सही केलेली कोरी कागदपत्रे तसेच प्राधिकृत अधिकारी व ठेकेदारांच्या स्वाक्षरीचे कोरे प्रमाणपत्रेसुद्धा आढळून आली आहे. या कारवाईने इतर संगणक चालक सावध झाले आहेत. मागील पाच वर्षातली ही पहिली कारवाई आहे. त्यामुळेच आजपर्यंत या योजनेत होणारा गैरप्रकार प्रशासनाने खपवून का घेतला? असा प्रश्नसुद्धा उपस्थित होत आहे.