यवतमाळ : सर्वत्र खासगी दवाखाने रुग्णांचे आर्थिक शोषण करणारे केंद्र बनले असताना यवतमाळ येथे ‘बिलिंग काऊंटर’ नसलेला दवाखाना उद्या शनिवारी रुग्णसेवेत दाखल होत आहे. ‘सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा’ या भगवान श्री सत्यसाई बाबांच्या विचारांना अनुसरून, सद्गुरु मधुसूदन साई यांच्या संकल्पनेतून आणि येथील समाजसेवी प्राचार्य डॉ. प्रकाश नंदुरकर यांच्या पुढाकारातून जनसेवेसाठी समर्पित असे ‘श्री सत्यसाई संजीवनी नेत्रालय, नेत्र संस्था आणि संशोधन केंद्र’ यवतमाळात उभे राहिले आहे. या श्री सत्यसाई संजीवनी नेत्रालयाचे उद्घाटन उद्या शनिवार, १९ जुलै रोजी सकाळी श्री सत्यसाई क्रीडा नगरी वाघापूर येथे होणार आहे. ज्यांच्या संकल्पनेतून हे नेत्रालय उभे राहिले ते ग्लोबल ह्युमॅनिटेरियन मिशनचे सर्वेसर्वा सद्गुरु श्री. मधुसुदन साई यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या रुग्णालयाचे आभासी पद्धतीनेउद्घाटन होणार आहे.
नंदुरकर परिवार हा यवतमाळात क्रीडा, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सेवा देत आहे. जनसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून श्री सत्यसाई संजीवनी नेत्रालयाची उभारणी झाली. जवळपास तीस हजार चौरस फुटांवर विस्तारलेल्या या आधुनिक नेत्रालयात रुग्णांना संपूर्णपणे नि:शुल्क सेवा पुरविण्यात येणार आहे. येथे डोळ्यांची तपासणी, निदान, शस्त्रक्रिया, औषधोपचार यासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. मोतिबिंदू, काचबिंदू, रेटिनाचे आजार, बुबुळाचे विकार, तसेच पापणी व तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया यासाठी विशेष उपचार दिले जाणार आहेत.
महिला, पुरुष आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष, तपासणी व उपचार केंद्र उपलब्ध आहे. एकाच वेळी आठ शस्त्रक्रिया होऊ शकतील, अशा तीन आधुनिक ऑपरेशन थिएटरची सोय येथे करण्यात आली आहे. या सोबतच देशभरातील नामांकित नेत्रतज्ञ येथे मोफत सेवा देणार असल्याचे डॉ. प्रकाश नंदुरकर यांनी सांगितले.या नेत्रालयात अद्ययावत पॅथॉलॉजी लॅब, रुग्ण व नातेवाईकांसाठी मोफत निवास व भोजन व्यवस्थासुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी डोळ्यांची मोफत तपासणी, चष्मा वाटप व जन्मजात विकारांवर विशेष उपचार या दवाखान्यात करण्यात येणार आहेत.
ही सेवा अधिकाधिक जनसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, तसेच ऑफर नेत्र उपचाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सत् चिकित्सा प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. प्रकाश नंदुरकर यांनी केले आहे. पूर्णपणे मोफत सेवा पुरवणारे विदर्भातील हे पहिले नेत्रालय असल्याचे सांगितले जात आहे.