यवतमाळ : येथील रेमंड कंपनीच्या हाऊसिंग कॉलनीतून एका बड्या अधिकाऱ्याच्या घरातून चोरट्यांनी तब्बल ३० लाखांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. ही घटना शहरातील लोहारा परिसरात असलेल्या एमआयडीसीमध्ये घडली. या घटनेने रेमंड वासहती खळबळ उडाली आहे. रेमंड कंपनीची सुरक्षा भेदून ही चोरी झाल्याने विविध शंका उपस्थित होत आहे. या प्रकरणी शुक्रवारी संजीवकुमार पांडे, रा. रेमंड हाऊसिंग कॉलनी यांनी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

तक्रारीनूसार, संजीवकुमार पांडे यांच्या मेहुणीच्या मुलाचे लग्न बिहारमधील पटना येथे असल्याने ते कुटूंबीयांसह १४ फेब्रुवारीला सकाळीच रवाना झाले होते. दरम्यान गुरूवार, २२ फेब्रुवारीला सकाळी रेमंड कंपनीचे युनीट हेड नितीन श्रीवास्तव यांनी पांडे यांना फोनद्वारे त्यांच्या घराचे लॉक तुटलेले दिसत असल्याची माहिती दिली. त्यानंतर पांडे तातडीने कुटूंबीयांसह पटना येथून यवतमाळ पोहोचले. यावेळी त्यांनी घरात प्रवेश करून पाहाणी केली असता, चोरट्यांनी कपाटातील ११० ग्रॅम सोन्याच्या सहा बांगड्या, १२० ग्रॅम सोन्याचा लक्ष्मीहार, ८० ग्रॅम सोन्याचा नेकलेस, ५० ग्रॅम सोन्याची चेन, ३० ग्रॅम सोन्याची चेन, ६० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ७५ ग्रॅमच्या तीन सोन्याच्या चेन, ६० ग्रॅमचे दोन सोन्याचे कडे, २० ग्रॅमचा डायमंड सेट आदींसह ६१ हजार रोख असा एकूण २९ लाख ११ हजार रूपयाचा मुद्देमाल लंपास झाल्याचे आढळले.

हेही वाचा : दुर्दैवी! मुदत संपण्यापूर्वीच सेंट्रिंग काढल्याने स्लॅब कोसळले, दोन मजूर मृत्यूमुखी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवधुतवाडी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. रेमंड कंपनी आणि वसाहत परिसरात २४ तास सुरक्षा असते. या परिसरात बाहेरचा कोणीही व्यक्ती परवानगीशिवाय आत जावू शकत नाही. प्रवेशद्वारावर प्रत्येक व्हिजिटरची नोंद केली जाते. त्यामुळे या वसाहतीतील बंगल्यात एवढी धाडसी चोरी करणारा हा परिसरतीलच असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.