नागपूर : सैराट या चित्रपटातील “आर्ची” हे पात्र रसिकप्रेक्षकांना आजही चांगलेच स्मरणात आहे. रिंकू राजगुरू या अभिनेत्रीने ते साकारले, पण टिपेश्वरच्या जंगलातील “आर्ची” खरी वाघीण आहे. तिने आणि तिच्या बछड्यांनी पर्यटकांना अक्षरशः वेड लावले आहे. कधी नव्हे ते पर्यटकांची पावले “आर्ची” व तिच्या बछड्यांची एक झलक बघण्यासाठी टिपेश्वरच्या जंगलाकडे वळत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा शिस्तीतला “मॉर्निंग वॉक” चा व्हिडिओ समोर आला होता. तर आता हीच “आर्ची” तिच्या बछड्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित फिरण्याचे धडे देतांना दिसून आली.

टिपेश्वरच्या अभयारण्यात विदेशातील वन्यजीव छायाचित्रकार मायकल स्टोन यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात “आर्ची” व तिच्या बछड्यांच्या या कृती टिपल्या. टिपेश्वर अभयारण्यातील पर्यटक मार्गदर्शक श्रीकांत सुरपान यांनी तो डेक्कन ड्रिफ्टचे वन्यजीव अभ्यासक पीयूष आकरे यांच्या मदतीने लोकसत्ताला हा व्हिडिओ उपलब्ध करून दिला. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात गेल्या काही वर्षात वाघांची संख्या वाढली आहे. अभयारण्याचे उत्तम व्यवस्थापन वाघांसाठी चांगला अधिवास तयार करत आहे. व्याघ्रदर्शनामुळे पर्यटकसुद्धा इकडे वळत आहेत. याच अभयारण्यातून ‘अवनी’ नामक एका देखण्या वाघिणीला गोळी घालून ठार करण्यात आले. तिच्यावर १४ माणसांचा बळी घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला. प्रत्यक्षात या अभयारण्यात इतर वाघ होते आणि हल्ले त्यांच्याकडूनसुद्धा झाले होते. गावकऱ्यांची सतत जंगलात होणाऱ्या घुसखोरीमुळे ‘अवनी’ धास्तावली होती. कारण ती गर्भवती होती आणि तिच्या पोटातील बछड्यांना या माणसांपासून धोका असल्याची भीती तिला होती. बछड्यांना जन्म दिल्यानंतरही माणसांची तिच्या अधिवासातील घुसखोरी थांबली नाही आणि यातून तिने एक-दोन हल्ले केले. यानंतर तिला गोळी घालून ठार करण्यात आले.

हेही वाचा : VIDEO : थंड वाऱ्याची झुळूक आणि ताडोबात वाघांची मस्ती

मात्र, या घटनेनंतर पर्यटकांनी या अभयारण्याकडे जवळजवळ पाठ फिरवली. आता अलीकडे वाघांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच आता या अभयारण्याला व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातच आता “आर्ची” व तिच्या बचड्यांनी पर्यटकांना अक्षरशः लळा लावला आहे.

सातत्याने पर्यटक या अभयारण्याकडे वाटचाल करत आहेत. त्यामुळे आता फक्त ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प नाही तर इतरही अभयारण्यातील वाघ पर्यटकांना आकर्षित करत आहेत.

Story img Loader