यवतमाळ : शहरात पुन्हा खुनाचे सत्र सुरू झाले आहे. चार दिवसांपूर्वी येथील लोहारा औद्योगिक वसाहतीत तरुणाच्या खुनाची घटना घडली होती. त्याची शाई वाळते न वाळते तोच, लोहारा लगत असलेल्या वाघापूर परिसरात आज सोमवारी पहाटे तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना उजेडात आली. आशीष माणिकराव सोनोने (३३) रा. प्रिया रेसिडेन्सी, चौसाळा रोड असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

आशीष हा रविवारी रात्री वाघापूर येथील आपल्या मित्राकडे गेला होता. यावेळी त्याच्यासोबत एका युवकाचा वाद झाला होता. काही मित्रांनी यात मध्यस्थी करून हा वाद मिटविला. दरम्यान मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास दोन तरुणांनी आशीषवर हल्ला केला. त्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. त्याचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

आज सोमवारी पहाटे ही घटना उजेडात आली. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसने, लोहारा पोलीस ठाण्याच्या ठाणेदार यशोधरा मुनेश्वर व पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. या तरुणाच्या हत्यचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. आठवड्याभरात शहरातील खुनाची दुसरी घटना घडल्याने शहरातील गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढल्याची चर्चा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आर्णी तालुक्यात १५ दिवसांपूर्वी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पुरुषाने महिला पार्टनरची क्षुल्लक कारणावरून डोक्यात बत्ता घालून हत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर चार दिवसांपूर्वी लोहारा औद्योगिक क्षेत्रात काही गावगुंडांनी दारू पिऊन एका मजुरावर प्राणघातक हल्ला करून त्याची चाकूने भोसकून हत्या केली होती. या घटनेतील आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले. मात्र शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. यवतमाळच्या गुन्हेगारीचा मुद्दा राज्याच्या विधिमंडळापाठोपाठ देशाच्या संसदेतही उपस्थित झाला आहे. मात्र त्यानंतरही यवतमाळात खून, खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ले या घटना सातत्याने घडत आहेत. शहरात बाल गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अल्पवयीन आरोपींचा गुन्हेगारीतील वाढता सहभाग सामाजिक चिंतेचा विषय ठरला आहे.