वाशीम : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघात कुणबी मताचे प्राबल्य असले तरी मागासवर्गीय, आदिवासी व मुस्लिमांची मते निर्णायक ठरणार आहेत. यावेळी येथून वंचितचा उमेदवार बाद झाल्याने वंचितने समनक जनता पार्टीच्या उमेदवारास पाठिंबा जाहीर केला असला तरी ही मते ‘गेम चेंजर’ ठरणार, असा कयास लावला जात आहे.
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री पाटील महाले व शिवसेना ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक वाटते तितकी सोपी राहिली नाही. शिवसेनेचा पारंपरिक गड असताना ऐनवेळी विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी नाकारून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिल्याने भावना गवळी यांना मानणारा वर्ग दुखावला गेला आहे. यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकीत कुणबी समाज खासदार भावना गवळी यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहिला असल्याचा इतिहास आहे.
हेही वाचा : नागपूरमध्ये मतदान कमी, भाजपमधील अस्वस्थतेची कारणे काय?
उमेदवारी नाकारली तरी खासदार भावना गवळी राजश्री पाटील महाले यांच्या प्रचारार्थ दिसून येत आहेत. मात्र यावेळी कुणबी मतदार कुणाच्या बाजूने राहतो. हे पाहणे औस्तुक्याचे राहील. या मतदार संघात अंदाजे कुणबी मराठा मतदार ५ लाखापेक्षा अधिक असल्याने या मताचे प्राबल्य दिसून येते. तर या पाठोपाठ बंजारा ३ लाख २५ हजार , अनुसूचित जाती २ लाख ७५ हजार , आदिवासी २ लाख ७५ हजार, मुस्लिम २ लाख २५ हजार असल्याचा अंदाज आहे.
हेही वाचा : लोकजागर : एका ‘मागणी’चा मृत्यू!
प्रचाराचा धुरळा थांबला असला तरी मतदानाला केवळ एक दिवस शिल्लक असल्यामुळे छुपा प्रचार व विजयाच्या जुळवा जुळव करण्यासाठी मोर्चे बांधणी होत असून या मतदार संघात मुस्लिम, आदिवासी आणि मागास वर्गीय मतांवर विजयाचे गणित अवलंबून राहील, असे भाकीत राजकीय गोटातून व्यक्त होत आहे.