अमरावती : तिवसा शहरातील पिंगळाई नदीचा पूल. एक महिला लहान मुलाला घेऊन त्या ठिकाणी पोहचली. तिने या मुलाला पुलाच्या कठड्यावर उभे केले. मोठ्याने बडबडत ती राग व्यक्त करीत होती.

काही क्षणातच तिने मुलाचा शर्ट पकडला आणि पुलाच्या कठड्यावर लटकवले. काही जागरूक लोकांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी लगेच धाव घेतली. महिलेला रोखण्याचा प्रयत्न केला. पण, ही महिला काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. ती या चिमुकल्याला नदीत फेकून देईल की काय, अशी भीती नागरिकांना होती. लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलीस घटनास्थळी पोहचले. नागरिकांची जागरूकता आणि पोलिसांची तत्परता यामुळे चिमुकल्याची सुटका झाली. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. तिवसा शहरात शुक्रवारी दुपारी हा धक्कादायक प्रकार घडला. एक महिला मोठमोठ्याने ओरडत मुलाला नदीत फेकून देण्याची धमकी देत असल्याचे लोकांना दिसले.

दोन ते तीन वर्षाच्या मुलाला पुलाच्या कठड्यावर लटकविण्याच्या या प्रकारामुळे एकच धावपळ उडाली. लोकांनी गर्दी केली. या महिलेचे तिच्या पतीसोबत सतत वाद होत होते. त्याला कंटाळून रागाच्या भरात या महिलेने हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या महिलेचे नाव कळू शकले नाही, पण तब्बल वीस मिनिटांचा हा प्रकार या मुलाच्या जीवावर बेतणारा देखील ठरू शकला असता.

या प्रकाराची चर्चा तिवसा शहरात रंगली आहे. पती-पत्नींमध्ये वाद होणे ही बाब सामान्य मानली जात असली, तरी त्याचे गंभीर पडसाद उमटू शकतात, ही बाब या घटनेतून समोर आली आहे. या महिलेने रागाच्या भरात उचललेले पाऊल हे या महिलेच्या आणि तिच्या मुलाच्या जीवावर बेतू शकले असते. दुर्घटना घडू शकली असती, पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी या महिलेची समजूत काढण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण, ही महिला काहीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हती. त्यामुळे तणाव वाढत चालला होता. पिंगळाई नदीच्या पुलावर बघ्यांची गर्दी देखील वाढत चालली होती. तब्बल वीस मिनिटांच्या प्रयत्नांनंतर या महिलेला समजावण्यात पोलिसांना यश आले. या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या प्रकारामुळे या परिसरात बराच काळ गोंधळाचे वातावरण होते.