नागपूर: राज्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान खात्याने आजही राज्यातील काही जिल्ह्यांना अतिमूसळधार तर काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा म्हणजेच काही जिल्ह्यांना रेड अलर्ट, काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. या इशाऱ्यामुळे राज्यात काही जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. मात्र, हवामान खात्याने अलर्ट देण्याचा आणि शाळांना सुटी देण्याचा मेळ काही जमला नाही.

भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांतील काही पाणलोट क्षेत्र आणि परिसरात पुढील काही तासांसाठी मध्यम स्वरूपाचा पूर येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक केंद्राने दिला आहे. हवामान विभागाने नागरिकांना घरातच राहण्याचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. रविवारी एका पुरुष आणि वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतर नागपूरकरांनी पालकांना आपल्या मुलांना घरातच सुरक्षित ठेवण्याचे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. पावसाची एकूणच स्थिती लक्षात घेता हवामान खात्याचा आणि केंद्राचा इशारा लक्षात घेऊनच राज्यातील रायगड तसेच विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. मात्र, शाळांना सुट्टी जाहीर करताच पावसाने दांडी मारली. अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके सतर्क असून सज्ज आहेत. पूर किंवा पाणी साचण्याच्या कोणत्याही घटनांचा सामना करण्यासाठी बचाव आणि मदत पथके तैनात करण्यात आली आहेत.

हेही वाचा >>>नागपुरात शाळांसमोरील चौकात वाहतूक कोंडी; विद्यार्थ्यांसह पालकांचाही जीव मेटाकुटीला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपुरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. शहरासह जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. चंद्रपूर जिल्ह्यातही हीच स्थिती होती. तर गडचिरोली जिल्ह्यात देखील पावसामुळे अनेक मार्ग बंद झाले. एरवी नद्यांना पूर येतो, पण आता शहरे आणि गावे देखील पाण्यात तुंबू लागल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे नागपूर शहरात काही महाविद्यालयीन विद्यार्थी अडकले. तर शाळकरी विद्यार्थी शाळांमध्ये पोहोचल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने त्यांना सुटी जाहीर केली. त्यामुळे घरी परतण्याचे मोठे आवाहन या विद्यार्थ्यांसमोर होते. ही स्थिती पुन्हा उद्भवू नये हे पाहूनच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर गडचिरोली, नागपूर, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांमधील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. मुसळधार पावसामुळे शाळेत जाताना अडचणी येऊ शकतात व विद्यार्थी शाळेत अडकू शकतात, ही शक्यता लक्षात घेऊनच खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता पावसानेच दांडी मारली.