नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा आपल्या भाषणात प्रसार माध्यमांविषयी बेधडक वक्तव्य केले आहे. देशातील प्रसार माध्यमांवर विविध प्रकारची टीका होत असतानाच गडकरींनी पुन्हा एकदा माध्यमांना आरसा दाखवला आहे. देशासमोर विचारभिन्नता ही समस्या नाही. पत्रकारांमध्ये निर्माण होत असलेली विचारशून्यता लोकशाहीसाठी घातक आहे. आज देशाला निर्भिड आणि बेधडक पत्रकारांची गरज आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. नागपूरमध्ये ‘एस. एन. विनोद – ८५ वर्षांची अनंत यात्रा’ या स्मारिकेचे प्रकाशन आणि सत्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून गडकरी बोलत होते.

एस. एन. यांच्या बेधडक पत्रकारितेचे कौतूक करताना गडकरी म्हणाले, आणीबाणीच्या काळात विनोदजी यांनी आपल्या संपादकीय लेखांमधून सरकारविरुद्ध बिनधास्त मतप्रदर्शन केले. त्यांनी ‘ बरोबर ते बरोबर आणि चुकीचे ते चुकीचे’ असे ठामपणे मांडत त्यांनी सरकारला आरसा दाखवला. लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकाराचे हेच मुळ कर्तव्य आहे. आज देशाला निर्भीड आणि बेधडक पत्रकारितेची गरज आहे, असे गडकरी म्हणाले. सोशल मीडियावरून स्तुतीसुमने उधळली जातात, तशीच कठोर टीका देखील होत असते.

केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले नेते आहेत. मात्र, मागील काही दिवसांपापूर्वी त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले जात आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर सुरू असलेल्या टीकांवर गंभीर आरोप केला आहे. ई-२० म्हणजेच २० टक्के इथेनॉल मिश्रित इंधनाच्या वापराबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नकारात्मक मोहिम राबवली जात आहे.

ही मोहीम फक्त इथेनॉलविरोधी नसून, मुद्दाम पैसे खर्च करून माझ्याविरुद्ध चालवली जात आहे, असे गडकरी म्हणाले होते. त्यानंतर नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात गडकरींनी पुन्हा एकदा प्रसार माध्यमांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या कार्यक्रमात गडकरींनी देशाला आज निर्भिड पत्रकारांची गरज असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी पत्रकारितेमध्ये काम करणाऱ्या विविध लोकांची उदाहरणे दिली. तसेच आणिबाणीच्या काळातही काही पत्रकारांनी अशाप्रकारे जोखमीचे काम केले याची माहिती दिली.