नागपूर : जागतिक स्तरावर वनक्षेत्रामध्ये भारताच्या कामगिरीत किंचित सुधारणा झाली असून, वन संसाधन मूल्यांकनात भारताने १०व्या क्रमांकावरून नवव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. वार्षिक वनक्षेत्र वाढीत भारताने तिसरा क्रमांक कायम ठेवला आहे. संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली.

इंडोनेशियातील बाली येथे अन्न आणि कृषी संघटनेने ‘जागतिक वन संसाधन मूल्यांकन २०२५’ क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत सर्वाधिक वनक्षेत्र विकसित करणाऱ्या देशांना स्थान मिळते.

जगातील एकूण वनक्षेत्र ४.१४ अब्ज हेक्टर आहे. यापैकी निम्म्याहून अधिक (५४ टक्के) फक्त पाच देशांमध्ये म्हणजेच रशिया, ब्राझिल, कॅनडा, अमेरिका आणि चीनमध्ये केंद्रित आहे. २०१५ ते २०२५ दरम्यान चीनने वनक्षेत्रात सर्वाधिक वार्षिक निव्वळ वाढ नोंदवली, जी दरवर्षी १.६९ दशलक्ष हेक्टर होती. त्यानंतर रशियन फेडरेशन नऊ लाख ४२ हजार हेक्टर आणि भारत एक लाख ९१ हजार हेक्टर होता.

भारत दहाव्या स्थानावरून नवव्या स्थानावर पोहोचणे ही ‘मोठी कामगिरी’ आहे. वृक्षारोपणात वाढत्या लोकसहभागामुळे, विशेषत: ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत आणि मोठ्या प्रमाणात राज्य सरकारच्या मोहिमांमुळे या प्रगतीत योगदान मिळाल्याची प्रतिक्रिया केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी ‘एक्स’वर व्यक्त केली.

वनक्षेत्र वाढीत आशिया एकमेव प्रदेश

१९९० ते २०२५ दरम्यान वनक्षेत्रात वाढ नोंदवणारा आशिया हा एकमेव प्रदेश आहे. जागतिक स्तरावर, जंगलतोडीचा वार्षिक दर निम्म्याहून अधिक कमी झाला आहे, असेही अहवलात नमूद आहे.