नागपूर : भारताला संपूर्ण विश्वाचे कल्याण करायचे आहे. हे करताना अपण जगावर उपकार करणार नाही. जगाला नवीन मार्ग दाखवल्यावर ते आपल्याला गुरू म्हणतील. पण, भारताला इतर देशांप्रमाणे महासत्ता नव्हे तर मित्रदेश बनायचे आहे, प्रामाणिकपणे जगाची सेवा करायची आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या वतीने प्राचीन सोमनाथ ज्योतिर्लिंग महारुद्र पूजा आणि श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये बुधवारपासून तीन दिवसीय महासत्संगाची सुरुवात झाले. या कार्यक्रमात भागवत यांनी ज्योतिर्लिंगाची पूजा केली. दरम्यान, श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते पंचाहत्तरीनिमित्त भागवत यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले. यानंतर भागवत यांनी मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, भगवान शंकर पवित्र आहेत. त्यांच्यावर कुठलाही कलंक लागू शकत नाही. आपले जीवनही त्यांच्याप्रमाणे सत्य आणि पवित्र राहायला हवे. हीच आपल्या पूर्वजांची शिकवण आहे. सुखी, सुंदर जग बनावे आणि त्यासाठी भारताने काम करावे, अशी जगाची इच्छा आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची एक चित्रफीत नुकतीच पाहिली. ती सत्य आहे का माहिती नाही. सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेकदा बनावटही येतात. या चित्रफितीमध्ये सांगितले आहे की, सध्या भारत समोर जात असून जगात क्रमांक एकचा देश बनणार आहे. त्यामुळे अमेरिका, रशिया, चीनसह सगळे चिंतेत आहेत. मात्र, ते भीतीमुळे चिंतेत नसून भारत समोर जात असताना आपण त्यांच्यासोबत कसे जुळवून घेणार याची त्यांना चिंता आहे. भारताची जनता गुणवान आणि कर्तृत्ववान आहे. आपला देश मोठा करण्यासाठी ती काम करत आहे. त्यामुळे भारतासोबत जुळवून घेण्यासाठी आम्ही काय करायला हवे, ही चिंता जगाला आहे. या चित्रफितीमुळे जग काय विचार करते, हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, याकडेही सरसंघचालकांनी लक्ष वेधले.
‘कुणी सेवा केली की उमेदवारी मागणार अशी शंका येते’
आपल्याला सेवा करायची आहे. सेवा करायची म्हणजे वृत्तपत्रात बातमी देणे नव्हे. सेवा केल्यावर त्याचा लाभ मागू नका. सेवा नि:स्वार्थ भावनेने असायला हवी. हल्ली कुणी खूप सेवा केली तर निवडणुकीची उमेदवारी मागणार का, अशी शंका येते, असेही डॉ. भागवत म्हणाले.
नागपूर संघाची भूमी, देशभक्तीचे केंद्र – श्री श्री रविशंकर
नागपूर ही संघाची भूमी आहे. त्यामुळे नागपूर देशभक्तीचे केंद्र आहे. संघाने कर्मनिष्ठ राहून समाज, देश आणि धर्मासाठी जीवन समर्पित केले. जीवनात भक्ती खूप आवश्यक आहे. भक्ती नसेल तर नैराश्यात आत्महत्या होतात. बाराव्या शतकात महाराष्ट्रातून भक्तीची लहर उठली. त्यामुळे हा मार्ग तुम्ही सोडू नका. सेवा कार्यासाठी संघ जगासाठी आदर्श आहे, प्रेरणादायी आहे, असे श्री श्री रविशंकर म्हणाले.