नागपूर : भारत शांतताप्रिय देश आहे. त्याला संपूर्ण युद्ध नको आहे, परंतु भारताविरुद्ध कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिवकण्यासाठी प्रतिउत्तर देणे आवश्यक असते. भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या काही भाग दहशतवाद्यांचे अड्डे उदध्वस्त केले आहे. आता पाकिस्तान आपले अस्तित्व जगाला दाखवण्यासाठी भारताविरुद्ध काहीतरी निश्चत कारवाई करेल. पण, भारत त्यांचा हल्ला शंभर टक्के परतवून लावेल, असे भारतीय हवाई दलाचे एअर व्हाईस चीफ मार्शल (निवृत्त) सूर्यकांत चाफेकर म्हणाले.

पाकिस्ताने दहशताद्यांमार्फत पहलगाम येथे हल्ला केला. त्यानंतर जनता भारतीय लष्कर काय करेल, याबाबत विचारणा करीत होती. भारताला संपूर्ण युद्ध करायचे नाही. परंतु पाकिस्तान प्रतिउत्तर द्यायचे होते आणि त्यासाठी हवाई दल एकमेव पर्याय होते. हवाई दलाचे काही गुणधर्म आहेत. हे दल दूरवर मारा करू शकतात. अचूक मारा करू शकतात आणि त्यांच्या कारवाईत सरप्राईज इलेमेंट असतो. शत्रूला काही कळण्याच्या हात हल्ला करण्याची क्षमता आहे.अलिकडे जगभर रात्रीच्या अंधारात कारवाई केली जाते. अंधारात अचूक कारवाई होऊ शकते. त्यासाठी आ‌वश्यक अतिशय प्रगत शस्त्र उपलब्ध आहेत. खूप दुरून अचूक मारा करणाऱ्या मिसाईल आहेत. भारताने बालकोटमध्ये प्रातिनिधिक स्वरुपाचे प्रतिउत्तर दिले होते. यावेळी एकाचवेळी अनेक ठिकाणांवर हल्ला चढवून पाकिस्तानला अद्दल घडवण्यात आली.

कोणतीही कारवाई करण्यापूर्वी गुप्तचर खात्याकडून गोळा केलेली माहिती महत्वाची असते. त्या माहितीनुसार लक्ष्य निश्चित केले जातात. त्यानुसार लक्ष्य बरोबर निवडल्या गेले आणि दहशतवाद्यांचे मुख्यालय किंवा त्यांचे अड्डे ध्वस्त करण्यात आले. मोजून मापून ही कारवाई करण्यात आली.पाकिस्तानने शिमला करार रद्द केला आहे. नियंत्रण रेषेचे महत्व उरले नाही. त्यामुळे भारताने पाकिस्तानाच्या हद्दीत जावून कारवाई केली. या पाकिस्तानच्या कांगव्याला काही अर्थ उरत नाही. भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईचा मुख्य उद्देश्य दहशतवाद्यांचे मुख्यालय, त्यांचे प्रशिक्षण केंद्र यांना नष्ट करणे होते.

या कारवाईची त्यांना सुद्धा साधारणत: कल्पना असेलच. त्यामुळे काहींनी पळ काढला असेल, काही अड्डे रिकामे असतील. पण, पळून पळून किती पळणार, आपल्या गुप्तचर यंत्रणा त्यांच्या मागावर असतील आणि ते जेथपर्यंत जातील, तेथपर्यंत त्यांच्या पिच्छा पुरवतील. आपण पाकिस्तान देशावर हल्ला करीत नाहीतर दहशतवाद्यांविरुद्धच लढाई करीत आहोत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.