नागपूर : देशातील हवामानबदलाचे चक्र कायम असून एकाचवेळी ऊन, पाऊस आणि थंडी पाहायला मिळत आहे. ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाचे तांडव कायम होते. आता उन्हाळा सुरू झाला असताना अधूनमधून थंडी तर अवकाळी पाऊस सुरूच आहे. भारतीय हवामान खात्याने आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्ये येत्या ११ ते १४ मार्चदरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. वायव्य सीमेवरून प्रवेश करणारे पश्चिमी वाऱ्यांचे झोत प्रामुख्याने उत्तर अरबी समुद्रावरुन येत आहेत. यामुळे पुढील चार दिवस उत्तरेकडील राज्यांमध्ये अवकाळी पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये दहा ते बारा मार्च या कालावधीत उत्तराखंड या राज्यात हलक्या पावसासह बर्फवृष्टीची शक्यता आहे.

हेही वाचा…नागपुरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी ‘सीपी लागले कामाला….आरोपींची कुंडली तयार..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१२ आणि १३ मार्चला पंजाबमध्ये तर १३ मार्चला हरियाणा, राजधानी दिल्लीसह पश्चिमी उत्तर प्रदेशात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय या चार दिवसांच्या कालावधीत जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बलुचिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश या राज्यांत देखील पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात मात्र पश्चिमी वाऱ्याचा कोणताही परिणाम होणार नसून पाऊस आणि गारपिटीची शक्यता नाही. मात्र, उत्तरेकडील राज्यात ती परिस्थती असल्यामुळे पहाटे गारवा वाढू शकतो, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.