लोकसत्ता टीम
नागपूर: रामटेक हा शिवसेनेचा बालेकिल्ला, पण यावेळी शिवसेनेवर विद्यमान खासदाराऐवजी भाजपने काँग्रेसमधून फोडून आणलेला उमेदवार स्वीकारण्याची वेळ आली. यामुळे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांची अवस्था ‘ तेलही गेले आणि तुपही गेले’ अशी झाली. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय तुमाने यांच्यासाठी आत्मघातकी ठरला, अशी चर्चा रामटेकमधील शिवसैनिकांमध्ये आहे
१९९९ ते २०२४ या पाच दशकात २००९ चा अपवाद सोडला तर रामटेकवर शिवसेनेचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. सेनेने उमेदवार द्यावा आणि कट्टर शिवसैनिकांनी तो निवडून आणावा, अशी स्थिती मधल्या काळात या मतदारसंघाची होती. ज्ञानयोगी म्हणून नावलौकिकप्राप्त श्रीकांत जिचकार यांचा पराभव या मतदारसंघात झाला. इतकी भक्कम स्थिती येथे सेनेची होती. १९९९ , २००४ अशा सलग दोन वेळा येथून सुबोध मोहिते सेनेकडून विजयी झाले होते. मोहिते इतके नशीबाव की त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्रात वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात स्थान दिले. पण त्यांनीही नंतर सेना सोडली, काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सेना सोडल्यानंतर मोहितेंची राजकीय कारकीर्द संपली. विद्यमान खासदार कृपाल तुमाने २०१४ आणि २०१९ अशा सलग दोन निवडणुकांमध्ये रामटेकमधून विजयी झाले. सर्वसामान्यात मिसळणारा एक सामान्य कार्यकर्ता वाटावा, अशी तुमानेंची प्रतिमा आहे. २०१९ मध्ये त्यांनी ५ लाख ९४ हजार ८२७ मते घेऊन काँग्रेसचे किशोर गजभिये यांचा पराभव केला होता तर २०१४ मध्ये ५ लाख १९ हजार मते घेऊन त्यांनी काँग्रेसचे मुकूल वासनिक यांचा पराभव केला होता. मातोश्रींशी तुमाने यांचे सलोख्याचे संबध होते. त्यामुळे २०२४ मध्ये तेच उमेदवार राहिले अस पण शिवसेनेतून शिंदे बाहेर पडल्यानंतर तुमाने त्यांच्या सोबत गेले. तेव्हापासून त्यांची फरफट सुरू झाली.
शिंदे यांचे एकूणच राजकारण भाजपच्या कलाने जात असल्याने व नागपूर जिल्हा हा भाजपच्यादृष्टीने महत्वाचा असल्याने या पक्षाकडून पद्धतशीरपणे तुमानेंचे पाय कापने सुरू केले. प्रथम रामटेक मतदारसंघावर दावा करण्यात आला, त्यासाठी सेनेची शक्ती कमी झाल्याचा दावा करण्यात आला, तसे सर्वेक्षणात (कोणी केले माहिती नाही) आढळून आल्याचे सांगण्यात आले. एकूणच ऐनकेन प्रकारे रामटेकची जागा घ्यायचीच अशा रितीने भाजपची मागील वर्षभरातील मोर्चेबांधणी होती. एकीकडे भाजप रामटेकवर दावा करीत होती, पण त्यांच्याडे सक्षम उमेदवाराचा वाणवा होता. काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे यांना फोडून रामटेकमधून पक्षातर्फे लढवण्याचे भाजपचे प्रयत्न होते. पण रामटेकवरचा दावा सोडला तर शिवसैनिकांमध्ये चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे शिंदे यांनी रामटेक न सोडण्याचा निर्णय घेतला पण भाजपने दिलेल्या उमेदवाराला पावन करून घेतले. यात तुमाने यांचा मात्र बळी गेला. ठाकरेंसोबत असते तर रामटेकमधून तेच उमेदवार असते असे आता कट्टर शिवसैनिक म्हणू लागले आहेत. तुमानेंची अवस्था मात्र ‘ तेलंही गेले आणि तुपही’ अशी झाली आहे.