अमरावती : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी गेल्या वर्षी नागपूर येथे ‘सलग २४ तास डोसे’ करण्याचा नवा विश्वविक्रम रचला होता. त्यांनी २४ तासात तब्बल १४ हजार ४०० डोसे तयार केले होते. आता त्यांनी स्वत:चाच विश्वविक्रम मोडणार असून ते अमरावतीत सलग २५ तास डोसे बनवणार आहेत.
विष्णू मनोहर म्हणाले, गेल्या वर्षी नागपूर येथे सलग २४ तास डोसे तयार करण्याचा विक्रम पूर्ण केला होता. या उपक्रमाला नागपूरकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता. इतर शहरांमध्ये नवीन विक्रम नोंदविण्याची इच्छा आहे. त्याच मालिकेत येत्या १८ ऑक्टोबर रोजी अमरावतीच्या एमआयडीसी मार्गावरील गुणवंत लॉन येथे सकाळी ७ वाजता या उपक्रमाला प्रारंभ होणार आहे.
दुसऱ्या दिवशी १९ ऑक्टोबरला सकाळी ८ वाजता त्याची सांगता होणार आहे. या विश्वविक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया या संस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत केली जाणार आहे.
विष्णू मनोहर म्हणाले, साधारणपणे दोन मिनिटांमध्ये २८ डोसे तयार करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी एकाचवेळी चार तवे ठेवण्यात येणार आहेत. विश्वविक्रमाच्या वेळी गुणवंत लॉन येथील ‘विष्णूजी की रसोई’ला भेट देणाऱ्यांना डोसे आणि चटणीचा नि:शुल्क आस्वाद घेता येणार आहे.
विष्णू मनोहर म्हणाले, मी हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेतलेले नाही, पण अनुभवातून बरेच काही शिकत आलो आहे. अजूनही शिकण्याचाच प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गाजवेलेले अफाट कतृत्व मला सतत प्रेरणा देत असते. आपल्या कलागुणांचा लाभ समाजासाठी व्हावा, हीच माझी इच्छा आहे. नवीन विश्वविक्रम रचताना लोकांचे मिळणारे प्रेम आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा मला अधिक ऊर्जा मिळवून देत असतो.
गेल्या वर्षी नागपूर येथे डोसे बनविण्याचा विश्व विक्रम नोंदविताना विष्णू मनोहर यांना डोशाचे ५०० किलो बॅटर, ५ हजार केळीची पाने आणि शंभर किलो चटणी लागली होती. सकाळी ८ वाजता त्यांनी डोसे करण्यास सुरूवात केली होती. त्यासाठी त्यांनी तीन तवे ठेवले होते. यावेळी अमरावतीत चार तव्यावर विष्णू मनोहर डोसे बनवणार आहेत.
विष्णू मनोहर यांनी अनेक विक्रम रचले. त्यामध्ये विविध भाज्या, खिचडी, पराठे यांचा समावेश आहे. आतापर्यंत त्यांनी खाद्यपदार्थांविषयी ५० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. पत्रकार परिषदेला ओजस्विनी असनारे, मधू त्रिपाठी उपस्थित होत्या.