नागपूर : दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वरील नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अलीकडच्या काळात वर्दळ वाढली असून काही जणांकडून मोबाईलद्वारे इमारतीची छायाचित्रे घेतली जात असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुख्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, कोतवाली पोलिसांकडून अपेक्षित सतर्कता बाळगली जात नसल्याची चर्चा आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपुरातील महालमध्ये आहे. हा परिसर शहर पोलिसांच्या कोतवाली ठाण्याअंतर्गत येतो. मुख्यालयाला असलेला घातपाताच्या कारवाईचा धोका लक्षात घेऊन इमारत परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावलेला आहे. तसेच कोतवाली पोलिसांचीही येथील प्रत्येक घडामोडीवर नजर असते. गोपनीय माहिती घेतली जाते. असे असतानाही मागील काही दिवसात संघ मुख्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही व्यक्ती संशयास्पद हालचाली करीत असल्याचे व ते मोबाईलद्वारे इमारतीचे छायाचित्रे घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्थानिक नागरिकांना दिसून आले अशी माहिती सूत्रांनी दिली. त्याच्याकडे ‘स्पाय कॅमेरे’ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही बाब गंभीर मानली जाते.
हेही वाचा – अपूर्ण झोपेमुळे मधुमेह, लठ्ठपणासह इतर आजारांचा धोका
संघ मुख्यालयावर यापूर्वी हल्ला झाल्याची घटना घडली होती. काही दिवसांपूर्वीच मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा दूरध्वनी पोलीस नियंत्रण कक्षाला आला होता. तसेच महापारेषणचा अभियंता सचिन कुलकर्णी यानेही मुख्यालय आणि स्मृती भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे पत्र पाठवले होते. एवढेच नव्हे तर ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा रईस अहमद शेख (काश्मीर) याने काश्मीरमधून येथे येऊन संघ मुख्यालयाची टेहळणी केली होती. विशेष म्हणजे, स्थानिक पोलिसांना याची काहीच माहिती नव्हती. असे प्रकार अनेकदा होऊनही कोतवाली पोलिसांनी यातून काहीही धडा घेतला नाही, असे सध्याचे चित्र आहे. ठाणेदार मुकुंद ठाकरे यांच्यासह तपास पथक किंवा गोपनीय विभागाने संघ मुख्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ज्या गांभीर्याने हाताळायला हवा त्या पद्धतीने तो हाताळला जात नाही, अशी चर्चा आहे.
हेही वाचा – नागपूर: राष्ट्रसंतांच्या व्याख्यानमालेत आत्मा, परमेश्वर भेटीचा बोलबाला!
कालावधी संपला तरी बदली नाही
कोतवालीचे ठाणेदार मुकुंदा ठाकरे यांना कोतवाली पोलीस ठाण्यात दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरी त्यांची बदली झाली नाही. त्यांच्यावर एवढी कृपादृष्टी का दाखवली जाते, याबाबत पोलीस दलात चर्चा आहे.
“संघ मुख्यालयाच्या आंतरिक सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा दलाचा तर बाह्य सुरक्षेसाठी कोतवाली पोलिसांचा ताफा तैनात आहे. याशिवाय शीघ्र कृतिदल, राज्य राखीव पोलीस दलाचेही अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. वरिष्ठ अधिकारीसुद्धा रोज भेटी देत असतात. वेळोवेळी सुरक्षा व्यवस्था सतर्क ठेवण्यासाठी ‘मॉक ड्रिल’सुद्धा घेतली जाते. सकाळी-सायंकाळी बॉम्बशोधक-नाशक पथकाकडून संघ मुख्यालयात तपासणी केली जाते. जेव्हा मुख्यालयाल उडवण्याच्या धमकीचे फोन येतात, त्यावेळी आम्ही शहानिशा करून आरोपींपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतो. आम्ही संघ मुख्यालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेत आहोत.” असे पोलीस उपायुक्त गोरख भामरे म्हणाले.