नागपूर: दीड कोटीचे २ कोटी ८० लाख रुपये रोख देण्याचे आमिष दाखवून युवा व्यापारी निराला कुमार सिंह आणि अंबरीश गोळे यांचा खून करायचा. दोघांचेही मृतदेह पेट्रोल टाकून जाळून टाकायचे, असा कट ओंकार तलमले आणि बजरंग दलाचा बडतर्फ संयोजक विशाल पुंज याने रचला होता.

मात्र, या कटात ओंकारच्या प्रेयसीचाही सहभाग होता, असा संशय आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या रडारवर ओंकारची प्रेयसीसुद्धा आली आहे. मोहिनी (२२, काल्पनिक नाव) ही ओंकारच्या लाकडावर कोरीव काम करण्याच्या कारखान्यात नोकरीवर होती. दिसायला सुंदर मोहिनी ओंकारच्या नजरेत भरली. तो तिला काही काम नसतानाही कॅबिनमध्ये बोलावून तिच्याशी वारंवार बोलत होता. भ्रमणध्वनीवरून वारंवार संदेश पाठवण्यासह विचारपूस करणे सुरू केले. दोघांत मैत्री झाली. तो तिला नेहमी बाहेर फिरायला जाण्यासाठी तगादा लावत होता. मात्र, ती टाळाटाळ करायची.

हेही वाचा… मूर्ती विमानतळाचा प्रस्ताव केंद्रीय वन सल्लागार समितीने फेटाळला; वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मोठा धक्का

ओंकारने शेवटी तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर दोघेही प्रेमात पडले. त्याने कारखान्याची सूत्रे मोहिनीच्या हाती दिली. ती कारखान्यातील पैशांचा सर्व व्यवहार सांभाळत होती. विशाल पुंज आणि ओंकारने कारखान्यातच निराला आणि अंबरीशच्या हत्याकांडाचा कट रचला होता. त्यावेळी मोहिनीसुद्धा तेथे उपस्थित होती. निराला आणि अंबरीशचा गोळ्या घालून खून केल्यानंतर दीड कोटींचा ‘डीडी’ सर्वप्रथम मोहिनीकडेच देण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

भव्य लग्न समारंभाचे स्वप्न

ओंकारला झटपट पैसा कमावून मोहिनीशी थाटामाटात लग्न करायचे होते. जवळपास एक कोटी रुपये खर्च करून लग्नाचा बार उडवायचा होता. पैशांसाठीच ओंकारने निराला आणि अंबरीशचा खून केला. ओंकारकडून मिळालेल्या दीड कोटीच्या ‘डीडी’मधून ५० लाख रुपये हत्याकांडातील अन्य आरोपींना दिले जाणार होते. मात्र, हत्याकांडाचे बिंग फुटल्यामुळे मोहिनीने लगेच ‘डीडी’ ओंकारच्या आईच्या हातात देऊन पळ काढल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तलमलेकडून पोलिसांची दिशाभूल

दुहेरी हत्याकांडाचा सूत्रधार ओंकार तलमले हा वारंवार पोलिसांची दिशाभूल करीत आहे. विशाल जर घटनास्थळावर आला असता तर विशालचाही गोळ्या घालून खून केला असता, अशी बनवाबनवी ओंकार करीत आहे. प्रेयसी मोहिनी आणि मित्र विशालला हत्याकांडातून वाचवण्यासाठी ओंकार प्रयत्न करीत पोलिसांना गुंगारा देत असल्याची माहिती आहे.