नागपूर: इटलीतील ग्रोसेटो येथे झालेल्या रस्ते अपघातात नागपुरातील दाम्पत्याचा मृत्यू झाला तर त्यांच्या मुलासह पाच जण जखमी झाले. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या घटनेला दुजोरा दिला. या घटनेबाबत आपण जाणून घेऊ या.

जावेद अख्तर (५७), नाझिरा अख्तर (४४) असे दगावलेल्या नागपुरातील दाम्पत्याचे नाव आहे. इटलीच्या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, ग्रोसेटो येथील ऑरेलिया राज्य रस्त्यावर उत्तरेकडे जाणाऱ्या लेनवर आशियाई पर्यटकांना घेऊन जाणारी व्हॅन आणि नऊ आसनी मिनीबसची धडक झाली. यात अख्तर दाम्पत्याचा मृत्यू तर त्यांच्या मुलांसह पाच जण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या पथकांनी आणि कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांनी जखमींनी तातडीने बचाव कार्य हाती घेत सगळ्यांना रूग्णालयात हलवले.

इटलीतील भारतीय दूतावासाने सांगितले की, ते पीडितांच्या कुटुंबीयांच्या आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. आम्ही कुटुंबाला सर्वतोपरी मदत करत आहोत. ग्रोसेटोजवळ झालेल्या अपघातात नागपूरमधील दोन भारतीय नागरिकांच्या दुःखद निधनाबद्दल दूतावासाकडून शोकही व्यक्त केला गेला. जखमींना उपचार दिले जात असल्याचेही दूतावासाचे म्हणणे आहे. या विषयावर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी लोकसत्ताला सांगितले की, इटलीतील ग्रोसेटो येथे झालेल्या रस्ते अपघातात अख्तर दाम्पत्याचा मृत्यू झाला असून त्यांच्या मुलासह इतर काही जखमी असल्याचे रोमधील भारतीय दूतावासाकडून कळवले गेले. वृत्त मिळेपर्यंत तिथे रुग्णालयात प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर अधिक माहिती मिळणे शक्य होईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. रात्री उशिरापर्यंत या कुटुंबातील नागपुरातील नातेवाईकबाबत माहिती मिळू शकली नाही.

रामटेक परिसरातही ट्रकच्या धडकेत दाम्पत्य ठार

नागपूर जिल्यातील रामटेक परिसरातील कांद्री माईन्स रेल्वे क्रॉसिंगजवळ एका ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दाम्पत्याचा मृत्यू झाला. अपघातामुळे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. सावनेर बडेगाव येथील सुनील मरस्कोल्हे (२८) आणि पत्नी प्रियांका मरस्कोल्हे (२२) नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना ट्रकने त्यांंना धडक दिली. पोलिसांनी या प्रकरणात ट्रक चालकाला अटक केली आहे.