जळगाव : जिल्ह्यातील बऱ्याच भागात शनिवारी रात्री तसेच रविवारी सकाळी झालेल्या पावसाने शेतात वेचणीवर आलेला कापूस मोठ्या प्रमाणात भिजला आहे. आधीच सीसीआयची खरेदी केंद्रे वेळेवर सुरू न झाल्याने कापसाला बाजारात अपेक्षित भाव नाही. त्यात पावसात भिजल्याने दर्जा खालावल्यानंतर खासगी व्यापारी कापसाचे भाव आणखी कमी करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील शेतकरी सप्टेंबरमधील अतिवृष्टीसह पुरामुळे केळी, कपाशी, सोयाबीन, मूग, उडीद, मका, ज्वारी आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे करून मदतीची घोषणा केली असली, तरी दिवाळी उलटल्यानंतरही बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मदतीची रक्कम जमा होऊ शकलेली नाही. दरम्यान, खरीप पिकांचे नुकसान झाल्यानंतर रब्बी पिकांपासून चांगल्या उत्पादनाची आशा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रयत्नांवर दिवाळीनंतरच्या पावसाने आता पाणी फेरले आहे. पाडव्याच्या दिवशीही बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती.

परतीच्या पावसाने आधीच जमिनीची वाफसा स्थिती संपल्याने रब्बीच्या पेरण्यांना जवळपास १५ ते २० दिवसांचा उशीर झाला आहे. त्यात आता पुन्हा पावसाची हजेरी लागल्याने जेवढ्या काही शेतकऱ्यांची पेरणी बाकी आहे, त्यांना आणखी काही दिवस वाफसा स्थितीसाठी थांबावे लागू शकते. अर्थातच, पेरणीला जेवढा उशीर होईल तेवढा परिणाम पुढे उत्पन्नावर होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सप्टेंबरमधील पावसाने मागील तीन महिन्यांची तूट भरून काढल्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद घेतली गेली आहे. त्यात आता पुन्हा दिवाळीनंतर पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे रब्बी हंगामाच्या पीक पेरणीचे नियोजन कोलमडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हवामान विभागाने रविवारीसाठी देखील राज्यातील जवळपास २५ जिल्ह्यात पावसाचा पिवळा इशारा (यलो अलर्ट) दिला आहे. ज्यामध्ये खान्देशातील जळगाव जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे.

मजुरांअभावी कापूस वेचणी रखडली

बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस दिवाळीआधी वेचणीवर आला होता. मात्र, भरपूर प्रयत्न करूनही वेचणीसाठी पुरेसे मजूर न मिळाल्याने शेतकऱ्यांना कापूस घरी आणता आला नाही. दिवाळी आणि भाऊबीजेसाठी बरेच मजूर बाहेरगावी निघून गेले होते. त्यात पावसाने पुन्हा तडाखा दिल्याने वेचणी राहून गेलेला कापूस झाडावर भिजला आहे. जमिनीलगतच्या बोंडांमधील कापसाचे पावसामुळे जास्त नुकसान झाले आहे. आता पाऊस थांबला तरी वेचून घरी आणलेल्या कापसात ओलावा असल्याने त्यास उन्हात वाळविण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागेल. त्यानंतरही ओलाव्याचे कारण देऊन व्यापारी कापसाला भाव देतील किंवा नाही, त्याची कोणतीच शाश्वती राहिलेली नाही.