नागपूर : कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संत कबीर नगर भागात राहणारी सुनीता जामगडे काही दिवसांपूर्वी नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तानात गेली होती. सुनीता कारगिलजवळील हुंदरमन गावातून पाकिस्तानात गेली आणि तेथील एका धर्मगुरूला भेटली. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी तिला अटक करून जेएमएफसी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने तिला २ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.  कोठडी संपल्यानंतर तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले आणि न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडीत पाठवले. सध्या ती नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात  आहे. या प्रकरणात तिला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत वकील देण्यात आला आहे. न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सुनीता जामगडेच्या जामीनासाठी अर्ज दाखल केला जाणार असल्याची सुरुवातीला चर्चा होती, मात्र जामीन अर्ज दाखल न करता सुनीताच्या मानसिक स्थितीबाबत अर्ज दाखल केला गेला.

मानसिक परीक्षणासाठी अर्ज

सुनीता ४ मे रोजी स्वतःच्या १२ वर्षीय मुलासोबत घरून निघाली होती. कारगिल बॉर्डरवरील शेवटचे गाव असलेल्या हुंदरमानमध्ये ती पोहोचली. तिथे गेल्यानंतर मुलाला परत येते असे सांगून एकटीच निघून गेली. तत्पूर्वी मुलाला घरी पाठवत असल्याचे बहिणीला फोन करून सांगितले. स्थानिक लोकांनी मुलाला लद्दाख पोलिसांच्या स्वाधीन केले होते. यानंतर नागपूर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. सध्या सुनीता न्यायालयीन कोठ़डीत आहे. या प्रकरणात तिला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत वकील देण्यात आला आहे. ॲड.प्रशांत परीपवार यांच्यामार्फत सुरुवातीला तिच्या जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात येणार होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, आता त्यांनी सुनीता ही मागील ३-४ वर्षांपासून मानसिक विकाराने ग्रस्त असल्याचे नमूद करत तिच्या मानसिक परीक्षणासाठी अर्ज दाखल केली आहे. या अर्जात सुनीता नागपूरच्या प्रादेशिक मानसिक रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे तिची वैद्यकीय महाविद्यालयातील मानसोपचार तज्ज्ञांकडून तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. हा अर्ज तिच्या वकिलांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयात दाखल केली असून, येत्या सोमवार, ९ जून रोजी यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सुनीता जमगाडेचा प्रोडक्शन वारंट घेण्यासाठी कारगिल पोलीस नागपूरच्या न्यायालयात अर्ज केला होता. परंतु आवश्यक न्यायालयिन कागदपत्रे न दिल्याने तूर्तास त्यांना वॉरंट मिळू शकलेला नाही. त्यामुळे कारगिल पोलीस सुनीताला सोबत न देताच परत गेली.