लोकसत्ता टीम

चंद्रपूर : सोशल मीडियावर बदनामीकारक, अश्लील पोस्ट व्हायरल करून ती काढून टाकण्यासाठी ५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या ‘माय चंद्रपूर’ या वेबपोर्टलचे पत्रकार लिमेशकुमार जंगम याला रामनगर पोलिसांनी अटक केली. जंगम याच्याविरुद्ध रामनगर पोलिसांनी खंडणी व अश्लील मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

‘माय चंद्रपूर’ या वेबपोर्टलच्या माध्यमातून पत्रकारिता करणारा लिमेशकुमर जंगम याने मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बदनामी करणारा अश्लील मजकूर व्हायरल करण्याची मोहीम उघडली होती. दरम्यान, लिमेशकुमार जंगम याने बुधवारी सकाळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नेत्यांच्या कुटुंबाबद्दल बदनामीकारक आणि अश्लील पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करून चरित्रहणन सुरू केले. याप्रकरणी जंगम याच्यावर सर्व स्तरातून टीका झाली. विशेषतः महिलांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

आणखी वाचा-नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाकडून माहिती अधिकाराचा भंग, सामाजिक कार्यकर्ते म्हणतात…

पोस्ट डिलीट करण्यासाठी मागितले ५ लाख

दुर्गापूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्रीनिवास जंगमवार यांनी लिमेशकुमार जंगम याला फोन करून सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट करण्याची विनंती केली. मात्र त्याने पोस्ट डिलीट करण्यासाठी ५ लाखाची खंडणी मागितली. एखाद्याची बदनामी करणारी पोस्ट टाकायची व नंतर पैसे मागायचे हा जंगम याचा व्यवसायच आहे. यापूर्वीदेखील त्याने अशाचप्रकारे खंडणी मागितली होती. त्या प्रकरणात तो फरार होता. काही दिवसांनंतर त्याला अटक झाली होती. जंगमने अशाप्रकारे अनेकांना त्रास दिल्याने श्रीनिवास जंगमवार यांनी थेट रामनगर पोलीस ठाणे गाठून जंगमविरुद्ध ५ लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामाजिक क्षेत्रातील महिलांकडून निषेध

प्राप्त तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी जंगमविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. याप्रकरणी रामनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक गाडे यांच्याशी संपर्क साधला असता, श्रीनिवास जंगमवार यांच्या तक्रारीवरून लिमेशकुमार जंगम याच्याविरुद्ध ५ लाखाची खंडणी मागितल्याची व अश्लील पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. त्याच्या पोस्टमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील काही राजकीय व्यक्तींच्या कुटुंबाबद्दल बदनामीकारक मजकूर होता, असेही ठाणेदार गाडे यांनी सांगितले. याप्रकरणी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांकडून निषेध व्यक्त होत आहे.