अमरावती : न्यायमूर्ती भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे ५२ वे सरन्यायाधीश बनणार आहेत. १४ मे रोजी भूषण गवई यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शपथ देतील. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान होणारे न्यायमूर्ती भूषण गवई हे सहावे मराठी व्यक्ती ठरतील.

न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म अमरावतीमध्ये झाला. केरळ व बिहारचे माजी राज्यपाल तसेच रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते रा. सू. गवई यांचे ते सुपूत्र आहेत. भूषण गवई यांचे प्राथमिक शिक्षण अमरावतीत झाले. १४ वर्षे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहिल्यानंतर त्यांना २४ मे २०१९ मध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून बढती मिळाली. आता ते सरन्यायाधीश होणार असून त्यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असेल. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. सोबतच निवडणुकांविषयी आपले मतही स्पष्टपणे व्यक्त केले.

देशात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनचा मुद्दा गाजत असताना याबाबत न्यायमूर्ती भूषण गवई यांनी निर्णय घेतला पाहिजे का, असा प्रश्न कमलताई गवई यांना माध्यमांच्या प्रतिनधींनी विचारला. त्यावर कमलताई गवई म्हणाल्या, “मी त्याची आई आहे. तो त्या खुर्चीत बसल्यावर त्याला योग्य वाटेल तो निर्णय घेईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये लोकांनाच केंद्रबिंदू मानलेले आहे. लोकांमधील एक व्यक्ती आणि एक सामान्य स्त्री म्हणून मी काय मत व्यक्त करणार, हे तुम्हाला माहित आहे. परंतु तुमची इच्छाच असेल, तर मतपत्रिकेवर निवडणुका घेणे केव्हाही चांगले आहे. यापूर्वीही मतपत्रिकेवरच निवडणुका व्हायच्या.”

कमलताई गवई यांनी आपण एक गृहिणी असल्याचे सांगताना न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या लहानपणीची आठवण सांगितली. घरातील ज्येष्ठ मुलगा असल्याने भूषण हा लहान वयातच परिपक्व झाला. १९७१ मध्य झालेल्या भारत बांगलादेश युद्धाच्या वेळी आम्ही फ्रेझरपुरा येथे वास्तव्याला असताना तो सैनिकांसाठी भाकरी बनविण्यासाठी मला मदत करीत होता, असे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुषार गांधी यांचेही मत सत्ताधारी वगळता अनेक राजकीय पक्षांनी ‘ईव्हीएम’बाबत संशय व्यक्त केला आहे. परंतु ओरड व्यक्त करण्यापलीकडे ते काहीही करू शकत नाहीत. त्यामुळे ‘ईव्हीएम’ विरोधात जनतेतून चळवळ उभी करावी लागेल, असे मत महात्मा गांधी यांचे पणतू ॲड. तुषार गांधी यांनी काल-परवा नांदेड येथे बोलताना व्यक्त केले होते.