नागपूर : न्या. भूषण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांच्या कतृत्व आणि कामगिरीबाबत तसेच त्यांच्या स्पष्ट वक्तपणाबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. काही महिन्यांपूर्वी एका प्रकरणाच्या सुनावणीला प्रारंभ करण्यापूर्वी न्या. गवई यांनी आपल्या राजकीय पार्श्वभूमी बाबत दोन्ही बाजूच्या वकीलांना सांगितले आणि काही हरकत असल्याबाबत विचारणा केली होती.
गुजरात उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांच्या ‘मोदी आडनाव’ टिप्पणीशी संबंधित गुन्हेगारी बदनामी प्रकरणात दोषी ठरवले हते. गांधी यांनी निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणाच्या सुनावणीला प्रारंभ करताना न्यायमूर्ती गवईं यांनी काही गोष्टी स्पष्ट करत असल्याचे सांगितले. दोन्ही बाजूंच्या वकिलांना संबोधित करताना ते म्हणाले, माझ्या बाजूने काही अडचणी आहेत, माझे वडील काँग्रेसचे सदस्य नव्हते, पण त्यांचा काँग्रेसशी खूप जवळचे संबंध होते. त्यांनी ४० वर्षांहून अधिक काळ काँग्रेसशी संबंध ठेवला आहे.
ते काँग्रेसच्या पाठिंब्यावर संसदेचे सदस्य, राज्य विधानसभेचे सदस्य होते आणि माझा भाऊ अजूनही राजकारणात आहे आणि काँग्रेसच्या जवळ आहे. या पार्श्वभूमीवर, तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल की मला हे प्रकरण हाताळले पाहिजे किंवा नाही. ? त्यानंतर दोन्ही बाजूंच्या वकीलांना कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले. तसेच न्यायमूर्तींनी स्पष्टपणे पार्श्वभूमीवर समोर आल्याबद्दल आभार व्यक्त केले होते. या प्रकरणात राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयातून दिलासा मिळाला आहे.
न्यायमूर्ती भूषण गवई यांचे वडील रा. सू. गवई हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे आंबेडकरी नेते होते. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाचे संस्थापक होते. त्यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात आणि देशाच्या संसदेत प्रतिनिधित्व केले होते, तसेच राज्यपालपदाची जबाबदारीही पार पाडली होती. त्यांनी राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले. रा. सू. गवई हे आंबेडकरी विचारधारेचे समर्थक होते आणि त्यांनी दलित समाजाच्या सशक्तीकरणासाठी मोठे योगदान दिले.
त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केला आणि दीक्षाभूमीच्या ऐतिहासिक महत्त्वाशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्यांनी सामाजिक न्याय आणि बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी कार्य केले. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक योगदानामुळे दीक्षाभूमीशी त्यांचा सिद्ध संबंध होता, कारण त्यांनी आंबेडकरी चळवळीला राजकीय आणि सामाजिक स्तरावर बळकटी दिली. भूषण गवई यांनी मात्र स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांनी राजकीय वारसा स्वीकारला नाही, तर न्याय क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांच्या न्यायिक निर्णयांमध्ये स्पष्टता आणि परखड भूमिका दिसून येते.