नागपूर : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असताना आणि भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले असताना नागपूरच्या सुनीता जामगडे यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश केला होता. एका सर्वसामान्य महिलेला थेट पाकिस्तानात जाणे कसे काय शक्य झाले. तिचे पाकिस्तानशी काय संबंध आहे? ती हेर तर नाही ना? , असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून तपास यंत्रणा या प्रश्नांचे उत्तरे शोधू लागल्या आहेत.
सुनीता १४ मे रोजी कारगिलमधील हुंडरमन गावातून नियंत्रण रेषा (एलओसी) बेकायदेशीरपणे ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे नागपूरच्या सुनीता जमगडे यांच्याविरुद्ध कारगिल पोलिसांनी ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट अंतर्गंत आणखी एक गुन्हा दाखला केला आहे. सुनीता यांच्या कृतींमुळे राष्ट्रीय सुरक्षेची गंभीर समस्या निर्माण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ओएसएअंतर्गत हेरगिरीचा हा नवीन खटला दाखल करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. त्याच्या प्रकरणाच्या तपासासाठी त्यांना ४३ वर्षीय सुनीताची कस्टडी हवी आहे. न्यायालयीन परवानगी आणि प्रोडक्शन वॉरंट मिळविण्यासाठी कारगिल पोलिसांचे एक पथक लवकरच नागपुरात येणार असल्याचे समजते. औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर, तिला कारगिल येथे नेले जाईल.
सुनीता १४ मे रोजी हुंदरमनहून पीओकेला गेली होती म्हणून कारगिल पोलीस तिला पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतील. ही घटना त्यांच्या अधिकारक्षेत्रात घडली आहे. त्यामुळे या प्रकरणाची नोंदणी झाली आहे, असे पोलिसांनी सांगितले.सुनीता तिच्या १४ वर्षांच्या मुलाला कारगिलमधील एका हॉटेलमध्ये सोडून हुंदरमन सेक्टरमधून पीओकेमध्ये गेली तेव्हा कारगिल पोलिसांनी सुरुवातीला बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली होती. २३ मे रोजी पाकिस्तान रेंजर्सनी तिला भारतीय एजन्सींच्या ताब्यात देण्यापूर्वी ती नऊ दिवसांपासून बेपत्ता होती.
दरम्यान, सुनीता जामगडे यांनी पाकिस्तानात अनधिकृत प्रवेश केल्याच्या प्रकरणामुळे संपूर्ण सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे. चार वर्षांपूर्वी सुनीता भूतान आणि नेपाळला गेली होती, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. सुनीता सध्या कपिलनगर पोलिसांच्या कोठडीत असून, ती पोलिसांना सहकार्य करीत नसल्याची माहिती आहे. कपिलनगरात राहणारी सुनीता जामगडे २०२१ मध्ये भूतानला गेली होती. त्यानंतर काही पैसे गोळा केल्यानंतर ती नेपाळला गेली. तेथे काही दिवस काम केल्यानंतर ती भारतात’ परतली.
सुनीता ही थोडेफार पैसे जमा झाल्यावर रेल्वेने विनातिकीट प्रवास करायची. तसेच रस्त्याने जाणाऱ्यांनाही नेहमी लिफ्ट मागायची. सुनीताचा घटस्फोट झाला असून, तिच्या पतीचा टेलरिंगचा व्यवसाय होता. सध्या सुनीता मुलासह राहत आहे.