यवतमाळ : उत्तराखंड राज्यातील रूद्रप्रयाग जिल्ह्यात आज रविवारी पहाटे झालेल्या भीषण हेलिकॉप्टर दुर्घटनेत जिल्ह्यातील वणी येथील एकाच कुटुंबातील तिघेजण ठार झाले. राजकुमार जयस्वाल (४२), श्रद्धा जयस्वाल (३४) आणि काशी जयस्वाल (२) सर्व रा. वणी अशी मृतांची नावे आहेत. जयस्वाल कुटुंबीय अन्य नातेवाईकांसोबत चारधाम यात्रेकरीता गेले होते. मात्र या दुर्घटनेत पती, पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाल्याने जयस्वाल कुटुंबावर आभाळ कोसळले आहे.

रूद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड येथे आज पहाटे खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. त्यात वणीतील जयस्वाल कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. या अपघातातील बहुतांश मृतक हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. हे सर्व भक्त आज पहाटे केदारनाथ दर्शनासाठी हेलिकॉप्टरने निघाले होते. दोन हेलिकॉप्टरमधून या सर्वांचा प्रवास सुरू होता, अशी माहिती आहे. दरम्यान जयस्वाल कुटुंबीय आणि गुजरात, उत्तरप्रदेशातील काही भक्त आर्यन एविएशनच्या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करत होते. गौरीकुंड – सोनप्रयागच्या जंगलात खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टर भरकटले आणि कोसळले. कॅप्टन राजबीरसिंग चौहान हे हेलिकॉप्टरचे पायलट होते. या दुर्घटनेत पायलटसह सातजण जागीच ठार झाले.

वणीतील जयस्वाल कुटुंबातील राजकुमार, श्रद्धा हे दाम्पत्य आणि त्यांची मुलगी काशी हे या अपघातात ठार झाल्याची माहिती जिल्ह्यात पोहोचताच एकच खळबळ उडाली. जयस्वाल कुटुंबावर मोठा आघात झाला. राजकुमार जयस्वाल हे वणीत राजा या नावाने ओळखले जात. वणीतील धार्मिक आणि सामाजिक कार्यात हे कुटुंब अग्रेसर होते. अलिकडेच त्यांनी वणी येथे पंडीत प्रदीप शर्मा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन केले होते. ते कट्टर शिवभक्त होते. त्यांच्या मुलीचे नामकरणही त्यांनी काशी असे केले होते. या अपघातात ठार झालेली काशी अवघ्या दोन वर्षांची आहे. तिच्यासह चारधाम यात्रा करण्याचा संकल्प जयस्वाल कुटुंबाने केला होता. काशीच्या नामकरणानंतर तिला काशीला दर्शनासाठी घेवून जाण्याचे स्वप्न पूर्ण होत असतानाच जयस्वाल कुटुंबावर काळाचा आघात झाला. दरम्यान या कुटुंबातील मुलगा विवान हा पांढरकवडा येथे आजोबांकडे असल्याने या प्रवासात सोबत नव्हता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेने वणी येथील जयस्वाल यांच्या घरापुढे नागरिकांना सांत्वनासाठी धाव घेतली. यवतमाळ पोलीस उत्तराखंड पोलिसांच्या संपर्कात आहेत. या घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.